बारामतीत पसरतो कोरोना; रुग्णांची वाढ लक्षणीय 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 4 August 2020

बारामतीतील रुग्णांची संख्या आता थेट 175 वर जाऊन पोहोचली आहे. मृत्यूदरही मोठा असल्याने शहरातील मृत्यूदर कमी करण्यासोबतच कोरोनाची लागण होऊ नये या साठी उपाययोजना करण्याचे आव्हान प्रशासनापुढे आहे. 

बारामती : शहरातील कोरोनाग्रस्तांची संख्या आता लक्षणीय वेगाने वाढू लागली आहे. काल घेतलेल्या 73 नमुन्यांपैकी बारामती परिसरातील दहा जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येने आता पावणेदोनशेचा टप्पा गाठला असून गेल्या आठवडाभरातील रुग्णांची वाढ लक्षणीय आहे. 

दरम्यान काल प्राप्त झालेल्या नमुन्यांपैकी तालुक्यातील जळगाव सुपे, मळद, डोर्लेवाडी, माळेगाव बुद्रुक येथील प्रत्येकी एक तर शहर परिसरातील खंडोबानगर, सुहासनगर, बारामती शहर, कुंभरकरवस्ती, देसाई इस्टेट, पाटस रस्ता येथील प्रत्येकी एक असे दहा जण कोरोनाग्रस्त आढळले आहेत.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दरम्यान रुग्णांची संख्या जशी वाढते आहे, तसे त्यांच्या संपर्कातील व्यक्ती शोधून त्यांच्या तपासण्या करण्याचे मोठे आव्हान आता यंत्रणेपुढे आहे. प्रत्येक पॉझिटीव्ह रुग्णाच्या संपर्कातील प्रत्येकाच्या तपासण्या करण्याने तपासणीचा आकडा जसा वाढत आहे तशी रुग्णांची संख्याही वेगाने वाढू लागली आहे. बारामतीतील रुग्णांची संख्या आता थेट 175 वर जाऊन पोहोचली आहे. मृत्यूदरही मोठा असल्याने शहरातील मृत्यूदर कमी करण्यासोबतच कोरोनाची लागण होऊ नये या साठी उपाययोजना करण्याचे आव्हान प्रशासनापुढे आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

नागरिकांची जबाबदारी अधिक
शहरातील दैनंदिन व्यवहारासाठी सकाळी ऩऊ ते पाच पर्यंत वेळ देण्यात आला आहे. रस्त्यावर, दुकानांमध्ये लोकांची होणारी गर्दी धडकी भरवणारी आहे. ग्राहकांसोबतच दुकानदारांनाही कोरोनाची लागण होण्याची भीती अधिक असल्याने सर्वांनीच ग्राहक संख्येवर बंधन घालण्यासह मास्क, सॅनेटायझर तसेच सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्याची गरज आहे. प्रशासकीय जबरदस्ती, कायदा किंवा नियम आणि दंडात्मक कारवाईपेक्षाही आपला व आपल्या सहका-यांना कोरोनापासून दूर ठेवण्यासाठी काळजी घेणे अनिवार्य आहे. येणारे ग्राहक कोण आहेत याची यादी व्यवस्थित करुन ठेवण्यासह मोबाईल क्रमांक व पत्ताही पूर्ण घेण्याची गरज निर्माण झाली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: covid 19 virus spread baramati city