फटाक्‍यांचा कर्कश आवाज यंदा घटला 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 5 नोव्हेंबर 2016

पुणे- दिवाळीत फटाक्‍यांची आतषबाजी मोठ्या प्रमाणात झाली असली, तरीही कानठाळ्या बसविणाऱ्या फटाक्‍यांचा कर्कश आवाज गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा मात्र घटल्याचे प्रकर्षाने दिसून आले. या वर्षी ध्वनिप्रदूषणाच्या सर्वसाधारण पातळीपेक्षा फटाक्‍यांचा आवाज अधिक होता, परंतु एकंदर प्रदूषणाची पातळी तुलनेने कमी होती. 

पुणे- दिवाळीत फटाक्‍यांची आतषबाजी मोठ्या प्रमाणात झाली असली, तरीही कानठाळ्या बसविणाऱ्या फटाक्‍यांचा कर्कश आवाज गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा मात्र घटल्याचे प्रकर्षाने दिसून आले. या वर्षी ध्वनिप्रदूषणाच्या सर्वसाधारण पातळीपेक्षा फटाक्‍यांचा आवाज अधिक होता, परंतु एकंदर प्रदूषणाची पातळी तुलनेने कमी होती. 

काही वर्षांपूर्वी दिवाळीत फटाक्‍यांच्या आवाजाने परिसर दणाणून निघत असे. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून आतषबाजीसारख्यिा फॅन्सी फटाक्‍यांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे फटाक्‍यांचा आवाज काही प्रमाणात नियंत्रित होत असल्याचे निरीक्षण महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने नोंदविले आहे. न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे राज्य सरकारने ध्वनिप्रदूषण कमी करण्यासाठी अत्यंत कडक नियम बनविले आहेत. त्याप्रमाणे औद्योगिक क्षेत्रात दिवसा 65 आणि रात्री 55, निवासी परिसरात दिवसा 55 आणि रात्री 45, तर शांतता क्षेत्रामध्ये दिवसा 50 आणि रात्री 40 डेसिबल ही आवाजाची मर्यादा निश्‍चित केली आहे. त्याशिवाय रात्री दहा ते सकाळी सहा या वेळेत कुठल्याही आवाजावर बंदी आहे. शहरातील ध्वनिप्रदूषण मोजण्यासाठी मंडळाने शिवाजीनगर, कर्वेनगर, पुणे-सातारा रस्ता, स्वारगेट, येरवडा, खडकी, कोथरूड, शनिवारवाडा, लक्ष्मी रस्ता, मंडई, सारसबाग, कोरेगाव पार्क या 12 ठिकाणी ध्वनिमापन यंत्रणा बसविली आहे. त्याद्वारे सकाळी सहा ते रात्री दहा आणि रात्री दहा ते सकाळी सहा अशा दोन वेळेस आवाजाची पातळी मोजली जाते. 

या वर्षी ध्वनिप्रदूषण तुलनेने कमी नोंदविले गेले असले, तरीही दिवाळीच्या तीन दिवसांत सर्वाधिक प्रदूषणाची नोंद लक्ष्मीपूजनाच्या दिवशी झाली. या दिवशी लक्ष्मी रस्ता परिसरात सर्वाधिक म्हणजे 93.3 डेसिबल इतकी आवाजाची पातळी नोंदविली गेली. गेल्या दोन वर्षांपासून लक्ष्मीपूजनाला कर्वेनगरमध्ये सर्वाधिक ध्वनिप्रदूषण नोंदविले गेले होते. या वर्षी कर्वेनगर, स्वारगेट, कोथरूड, शनिवारवाडा, मंडई, सारसबाग परिसरात 80 डेसिबलपेक्षा अधिक आवाज नोंदविला गेला. लक्ष्मीपूजनाच्या तुलनेत पाडवा आणि भाऊबीज या दिवशी फटाक्‍यांचा आवाज लक्षणीयरीत्या कमी झाल्याचे मंडळाच्या अहवालात नमूद केले आहे.

Web Title: Crackers Squawk declined this year