Video : पाश्‍चात्त्यांवर प्रभाव पाडण्यासाठीच ‘जिटार’ची निर्मिती : नीलाद्रीकुमार

nilidikumar-vijayghate
nilidikumar-vijayghate

‘‘आपण धोती कुर्ता सोडला. आपल्या कपड्यांवर पाश्‍चात्य प्रभाव आहे. जीवनशैली बदलली तर संगीत का नको? म्हणूनच आपल्या संगीताचा प्रभाव इतर देशांवर पडावा, आपल्या परंपरेशी तरुणांना जोडता यावे म्हणून जिटार निर्मितीचा प्रयोग केला आहे,’’ असे सतारवादक नीलाद्रीकुमार यांनी सांगितले.

सवाईतील सादरीकरणानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. तुम्ही आपल्या संगीताला पाश्‍चात्य संगीतासाठी जोडण्यासाठी सतार आणि गिटार एकत्र आणून ‘जिटार’ हे वाद्य तयार केले आहे. शास्रीय संगीत महोत्सवांमध्ये यांसारखे बदल व्हायला हवेत का, या प्रश्नावर ते म्हणाले, ‘काही बदल हे हवेतच; पण फार बदलाची गरज नाही. कारण, बदल हे होत राहतात. नवी पिढी आली की नवे बदल घेऊन येते. त्यामुळे बदल केले नाही, तरी ते घडत राहतात.’

नीलाद्रीकुमार यांनी ते लहान असताना षण्मुखानंद हॉलमध्ये पाहिलेल्या पं. भीमसेन जोशी यांच्या मैफलीची आठवण सांगितली. त्या वेळी पंडितजींचे गाणे लोक मंदिरात हात जोडून नमस्कार करतात, तसे हात जोडून ऐकताना पाहिले आहे, असे चित्र मला आजपर्यंत कुठेही पाहायला मिळाले नाही, असे ते म्हणाले.

ते म्हणाले, ‘तरुण पिढीला शास्रीय संगीतात प्रचंड रस निर्माण होतो आहे, हे या महोत्सवातील तरुणांची गर्दी पाहिली की पटते, हे चित्र खूप समाधानकारक आहे; पण ही पिढी डिजिटल आहे. नवे तंत्रज्ञान एकदा स्थिरस्थावर झाले की त्यांच्याकडून गॅजेटचा होणारा अतिवापर कमी होईल,’ असे ते म्हणाले.

पुणेकरांना ‘पुणेरी’ टोला...
नीलाद्रीकुमार हे वादनात दंग असतानाच त्यांनी अचानक माइक हातात घेतला आणि म्हणाले, ‘काही लोक आपल्या नव्हे; तर कॅमेऱ्याच्या डोळ्यांनी हे वादन पाहात आहेत. काही वेळेसाठी हे ठीक आहे. तसंही आम्ही फार भारी काही वाजवत नाही आहोत. तेव्हा मोबाइल बाजूला ठेवून डोळ्यांनी पाहिले तर आम्हालाही तुमच्या डोळ्यांत पाहिल्यासारखे वाटेल आणि संगीताबरोबरच तुम्ही आम्ही एकमेकांपर्यंत पोचू...’, असा टोला त्यांनी लगावला आणि रसिकांमध्ये प्रचंड हशा पिकला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com