पदवीच्या प्रथम वर्षाच्या अभ्यासक्रमांना क्रेडिट सिस्टिमचा फटका

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 24 जानेवारी 2020

कला, विज्ञान, वाणिज्य या शाखेतील निकाल क्रेडिट सिस्टिमनुसार लावताना त्यामध्ये काही अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्यात बदल करणे आवश्‍यक असल्याने या विषयातील अधिष्ठात्यांची समिती नेमून या नियमावलीत बदल करण्यात आले. यामुळे निकालास विलंब झाला. पुढील दोन दिवसांमध्ये महाविद्यालयांकडे निकाल पाठवला जाईल.
- डॉ. अरविंद शाळिग्राम, संचालक, परीक्षा व मूल्यांकन विभाग 

पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने यंदापासून पदवीच्या प्रथम वर्षाच्या अभ्यासक्रमांना क्रेडिट सिस्टिम सुरू केल्यानंतर, त्यातील त्रुटींचा फटका पहिल्या सत्राच्या निकालाला बसला आहे. विद्यापीठाला कमाल ४५ दिवसांत निकाल लावण्याचे बंधन असतानाही दोन महिने होत आले, तरी पदवीच्या कोणत्याही अभ्यासक्रमाचा निकाल अद्याप जाहीर झालेला नाही.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पुणे विद्यापीठामार्फत बीए, बीकॉम, बीएससी, बीबीए, बीएससी (कॉम्प्युटर), बीसीए, बीबीएम या पदवीच्या अभ्यासक्रमाच्या पहिल्या सत्राची परीक्षा ऑक्‍टोबर-नोव्हेंबर महिन्यात पार पडल्या. त्यानंतर महाविद्यालयांनी उत्तरपत्रिका तपासून त्यांचे गुण २० डिसेंबरपर्यंत पुणे विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यांकन विभागाकडे पाठविले होते. काही दिवसांनी विद्यापीठांकडून निकाल अंतिम करून तो जाहीर करण्यासाठी महाविद्यालयांकडे पाठविणे आवश्‍यक होते. मात्र जानेवारी महिना संपत आला तरी अद्यापही महाविद्यालयांकडे अंतिम गुण पाठविण्यात आलेले नाहीत.

'राजमुद्रेचा गैरवापर केल्याप्रकरणी राज ठाकरेंविरुद्ध गुन्हा दाखल करावा' 

यापूर्वी गुणांचे मूल्यांकन महाविद्यालय स्तरावर करून महाविद्यालयाच निकाल लावत होते. यंदापासून पदवीच्या प्रथम वर्षासाठी क्रेडिट सिस्टिम लागू झाल्याने हे गुण विद्यापीठाकडे पाठविले गेले. त्यांचे विद्यापीठाकडून मूल्यांकन पूर्ण झाले की ते महाविद्यालयाला पाठवून निकाल जाहीर केले जाणार आहेत. काही अभ्यासक्रमांची परीक्षा ५ नोव्हेंबरला, तर काहींची ३० नोव्हेंबरला संपली. परीक्षा होऊन दीड ते अडीच महिने होत आले, तरी अद्याप निकाल जाहीर केलेला नाही. विद्यापीठाने क्रेडिट सिस्टिम लागू करण्यासाठी गडबड केल्याने हा उशीर होत आहे, याचा फटका विद्यार्थांना बसणार आहे, असे माजी अधिसभा सदस्य डॉ. अतुल बागूल यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Credit system hits first year courses