शवदाहिन्यांतही ‘कमिशनबाजी’ (व्हिडिओ)

ज्ञानेश सावंत
गुरुवार, 11 एप्रिल 2019

पुणे : प्रत्येक गोष्टीत ‘कमिशनबाजी’ करणारे महापालिका प्रशासनातील बाबू आता मृतांच्या टाळूवरील लोणी खाऊ लागले आहेत. स्मशानभूमीतील शवदाहिन्यांच्या देखभालीवर पाच वर्षांत जेमतेम तीन कोटी रुपयांची कामे करून दहा कोटी रुपये खर्च झाल्याचा हिशेब प्रशासनाने दाखविला आहे. गेल्या वर्षी सव्वा कोटी रुपयांचे काम करण्यात आले. मात्र, त्याचा हिशेब पावणेतीन कोटींपर्यंत गेल्याचे समोर आले आहे.

शवदाहिन्यांच्या देखभाल दुरुस्तीवर भरमसाट खर्च केवळ कागदोपत्री आहे. एवढ्या खर्चाची कल्पना संबंधित ठेकेदारांनाही नाही. दाहिन्यांवरील खर्चाचा गोंधळ आणि प्रत्यक्ष दाहिन्यांची स्थिती ‘सकाळ’ने जाणून घेतली तेव्हा दाहिन्याच मृतप्राय अवस्थेत असल्याचे उघड झाले. त्यामुळे स्मशानासाठीची ही रक्कम गेली कुठे, असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे. या लुटीत ठेकेदारही मागे नसल्याचे स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांनी उघडपणे सांगितले. शहरातील स्मशानभूमींमध्ये आठ विद्युत आणि पाच गॅस दाहिन्या आहेत. गेल्या १२ वर्षांत या दाहिन्या उभारल्या आहेत. त्यांच्या देखभाल दुरुस्तीचे काम ठेकेदाराकडे आहे.

या दाहिन्यांमध्ये महिन्याला साधारणपणे पावणेदोनशे मृतांवर अंत्यसंस्कार होत असल्याची नोंद महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयांकडे आहे. या दाहिन्यांमध्ये एकूण किती मृतांवर अंत्यसंस्कार झाले, याचा नेमका आकडा कुठेच सापडत नाही. या नोंदींची जबाबदारी क्षेत्रीय कार्यालयांकडे असल्याचे सांगून आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी हात झटकले. काही क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडील मासिक अहवाल पाठविले. त्यात मृतांच्या संख्येचा ताळमेळ लागला नाही. मात्र, दाहिन्यांवरील खर्चाची रक्कम तंतोत जुळलेली आढळली.

पर्यावरणाच्या दृष्टीने शवदाहिन्या उभारल्या आहेत. त्यांची देखभाल दुरुस्ती नियमित करणे अपेक्षित असून, ठेकेदाराकडून ती करण्यात येते. नेमकी किती कामे होतात आणि त्यावरील खर्च, याचा अहवाल मागविण्यात येईल. 
- डॉ. रामचंद्र हंकारे, प्रमुख, आरोग्य विभाग, महापालिका

Web Title: Cremation Ground Commission Municipal