‘आरटीओ’ची ७५ खासगी बसवर कारवाई

Private-Bus
Private-Bus

पुणे - ‘परमिट’च्या नियमांचे उल्लंघन करून प्रवासी वाहतूक करणाऱ्या ११८ खासगी बसची प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) अचानक तपासणी केली. त्यातील ७५ बसवर कारवाई करण्यात आली. त्यापैकी ४७ बस ताब्यात घेण्यात आल्या आहेत. 

क्षमतेपेक्षा जादा प्रवासी वाहतूक होते, कर भरलेला नसतो, विमा नसतो, एसी बस असली तरी, एसी बंद असतो, फिटनेस प्रमाणपत्र नसते आदी विविध प्रकारच्या तक्रारी प्रादेशिक परिवहन विभागाकडे आल्या होत्या. त्याची दखल घेऊन प्रादेशिक परिवहन अधिकारी बाबासाहेब आजरी यांच्या नेतृत्त्वाखाली उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद सगरे यांनी पुणे, बारामती, अकलूर, पिंपरी-चिंचवड, सोलापूर येथील परिवहन अधिकाऱ्यांची मदत घेतली. त्यानुसार सहा पथके तयार करण्यात आली. गुरुवारी रात्री आठ वाजल्यापासून पुणे- मुंबई रस्ता, पुणे- नाशिक रस्ता, पुणे- सातारा रस्ता, पुणे- सोलापूर रस्त्यावर या पथकांनी तपासणी सुरू केली. क्षमतेपेक्षा अधिक माल वाहतूक करणे, जादा प्रवासी घेणे, परमिटच्या नियमांचे उल्लंघन करणे, विमा नसणे, कर भरलेला नसणे, फिटनेस प्रमाणपत्र नाही आदी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ७५ बसवर कारवाई करण्यात आली. एकापेक्षा अधिक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ४७ बस ‘आरटीओ’ने ताब्यात घेतल्या आहेत. त्या सध्या राजा मोतीलाल मिल बहादूर रस्त्यावर ठेवण्यात आल्या आहेत. मोटार वाहन कायद्यातील नियमांनुसार त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे सगरे यांनी नमूद केले.

ऐन ‘सीझन’मध्ये कारवाई
प्रजासत्ताक दिन यंदा शनिवारी आला आहे. त्यामुळे नागपूर, चंद्रपूर, अमरावती, नाशिक, कोल्हापूर, जळगाव, धुळे, लातूर, उस्मानाबाद, नादंडे आदी शहरांकडे परतण्यासाठी प्रवाशांची गुरूवारपासूनच गर्दी झाली होती. ‘आरटीओ’च्या अचानक कारवाईमुळे अनेक बस संबंधित शहरांत पोचण्यास उशीर झाला. तसेच ‘आरटीओ’ने बस ताब्यात घेतल्यामुळे संबंधित प्रवाशांची गैरसोय झाली. त्यामुळे त्या-त्या प्रवासी वाहतूक कंपन्यांना पर्यायी बसची व्यवस्था करावी लागली. ऐन ‘सिझन’मध्ये झालेल्या कारवाईमुळे वाहतूकदारांचे कंबरडे मोडले, अशी प्रतिक्रिया एका वाहतूकदाराने ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com