सदोष मनुष्यवधाचा तीन जणांवर गुन्हा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 10 मे 2019

राजयोग साडी गोडावूनला आग लागून कामगारांचा मृत्यू झाल्याप्रकरणी तिघांविरुद्ध मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

पुणे - राजयोग साडी गोडावूनला आग लागून कामगारांचा मृत्यू झाल्याप्रकरणी तिघांविरुद्ध मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

याप्रकरणी पोलिस कर्मचारी हेमंत शरदचंद्र कामथे यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून लोणी काळभोर पोलिस ठाण्यात तिघांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

भवरलाल हजारीमल प्रजापती (रा. स्वामी नारायणनगर सोसायटी, गुजरात), सुरेश राजाराम जाकड आणि सुशील नंदकिशोर बजाज (दोघे रा. शिंदेवस्ती, उरळी देवाची) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. त्यापैकी सुरेश जाकड आणि सुशील बजाज या दोघांना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती लोणी काळभोर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सूरज बंडगर यांनी दिली.

प्रवासापूर्वीच काळाचा घाला
फुरसुंगी : उरुळी देवाची येथील राजयोग साडी शोरूमला लागलेल्या आगीत होरपळून पाच कामगारांचा मृत्यू झाला. घटना घडली त्या वेळी शोरूमच्या शटरला टाळे असल्याने या कामगारांना बाहेर पडता आले नाही. यातील एकाला दुसऱ्या दिवशी नातेवाइकाच्या लग्नासाठी राजस्थानला जायचे होते. मात्र, प्रवासाला निघण्यापूर्वी त्याच्यावर काळरात्र ओढवली.

या शोरूममध्ये अंदाजे पंचवीस कामगार कामाला आहेत. ते बाहेर भाड्याने खोल्या घेऊन किंवा नातेवाइकांकडे राहतात. मात्र, आगीत मृत्यू झालेले पाचही जणांना रोज रात्री चोरी होऊ नये, यासाठी शोरूममध्ये झोपविले जात होते. शोरूमचालक रात्री शटरला कुलूप लावून घरी जात होते. मृत कामगारांपैकी एकाच्या नातेवाइकाचे राजस्थानला लग्न असल्याने तो बॅग भरून झोपण्यासाठी शोरूममध्ये आला होता.

 गुरुवारी सकाळी तो गावी जाणार होता, असे समजते. मात्र, प्रवासाला निघण्याआधीच  त्याचा या आगीत होरपळून मृत्यू झाला. मृत झालेल्या कामगारांपैकी दोन जण शोरूमचे सहभागीदार असलेल्या सुशील बजाज यांचे मावसभाऊ होते. तसेच अन्य एक जणही बजाज यांचा नातेवाईक होता. 

या कामगारांचे आईवडील व नातेवाईक राजस्थानला असल्याने दिवसभरात घटनास्थळी कुणी दिसले नाही. तसेच परिसरातील दुकाने दिवसभर बंद  होती. सासवड रस्त्याच्या दोन्ही बाजूने सुमारे शंभर कपड्याची दुकाने आहेत. यापैकी परप्रांतीय चालकांनी आपल्या मूळ गावाकडून बहुतांश कामगार आणले आहेत. काही दुकानदार चोरी होऊ नये म्हणून कामगारांना रात्री शोरूममध्ये झोपवतात. यातून ही घटना घडल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

सासवड रस्ता परिसरात कपड्यांची दुकाने व गोडाऊन आहेत. तसेच महापालिकेचा कचरा डेपोही आहे. त्यामुळे येथे स्वतंत्र अग्निशमन केंद्र असणे गरजेचे आहे. 
- तात्यासाहेब भाडळे,  माजी उपसरपंच, उरुळी देवाची


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: crime against three people