बोगस रेशन कार्ड काढणाऱ्या दोन जणांवर गुन्हा 

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 20 September 2020

लोहगाव, कलवड येथील व्यक्तीने दीड लाख रुपयांची वैद्यकीय सवलत घेण्यासाठी शिधा पत्रिकेसाठी तब्बल तीस हजार रुपये मोजले. काही महिन्यानंतर शिधापित्रकेवर कोणत्या रेशन दुकानात धान्य मिळेल, याची चौकशी करण्यासाठी ती व्यक्ती ई- परिमंडळ कार्यालयात आली. संबंधित परिमंडळ अधिकारी यांना शिधापत्रिका बोगस असल्याचे लक्षात येताच त्यांनी येरवडा पोलिस ठाण्यात संबंधित व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

येरवडा  (पुणे) : लोहगाव, कलवड येथील व्यक्तीने दीड लाख रुपयांची वैद्यकीय सवलत घेण्यासाठी शिधा पत्रिकेसाठी तब्बल तीस हजार रुपये मोजले. काही महिन्यानंतर शिधापित्रकेवर कोणत्या रेशन दुकानात धान्य मिळेल, याची चौकशी करण्यासाठी ती व्यक्ती ई- परिमंडळ कार्यालयात आली. संबंधित परिमंडळ अधिकारी यांना शिधापत्रिका बोगस असल्याचे लक्षात येताच त्यांनी येरवडा पोलिस ठाण्यात संबंधित व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास येरवडा पोलिस ठाणे करीत आहे. त्यामुळे बोगस शिधापत्रिकेचे रॅकेट उघड होऊ शकते, असे पोलिसांनी सांगितले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

ई-परिमंडळ अधिकारी प्रशांत खताळ म्हणाले, ""सय्यद सलमान अल्ताफ हे शिधापत्रिका घेऊन कार्यालयात आले होते. त्यांनी शिधापत्रिकेवर धान्य मिळत नसून, हे कार्ड कोणत्या रेशन दुकानाला जोडले आहे, अशी विचारणा केली. संबंधित शिधापत्रिका येरवडा परिमंडळ कार्यालयाच्या अभिलेखावर कोठेही नोंद आढळून आली नाही. शिधापत्रिकेचा कागद व कार्यालयातून वितरित होणाऱ्या शिधापत्रिकेमध्ये तफावत दिसून येत आहे. त्यासह तत्कालीन परिमंडळ अधिकाऱ्यांची बनावट सही व शिक्का दिसून आले. त्यामुळे येरवडा पोलिस ठाण्यात जाऊन संबंधित व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.'' 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

रफिक छप्परबंद (रा. कलवड वस्ती) यांनी ही शिधापत्रिका काढून दिल्याचे सय्यद यांनी सांगितले आहे. बोगस शिधापत्रिका काढून सरकारची फसवणूक केल्याचा गुन्हा छप्परबंद व सय्यद यांच्यावर दाखल केल्याचे येरवडा पोलिसांनी सांगितले. 

वैद्यकीय सुविधेसाठी बोगस शिधापत्रिकेचा वापर 

महापालिकेच्या वतीने शहरी गरीब आरोग्य योजने अंतर्गत दोन लाख रुपयांपर्यंत वैद्यकीय बिलात सूट दिली जाते. त्यासाठी एक लाख रुपये उत्पन्नाचा दाखला, शिधापत्रिका आवश्‍यक असते. त्यामुळे केवळ वैद्यकीय सुविधेसाठी तीस ते चाळीस हजार रुपये घेऊन बोगस शिधापत्रिका काढणारी टोळी सक्रिय असल्याची शंका व्यक्त केली जात आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Crime against two people for issuing bogus ration cards