पुणे - उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर येरवडा कारागृहातून बाहेर आलेला हिंदू राष्ट्र सेनेचा प्रमुख धनंजय देसाई याची मिरवणूक काढणाऱ्यांवर येरवडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. विनापरवाना मिरवणूक काढणे, मोटार वाहन कायदा व जमावबंदी आदेशाचा भंग करणे या स्वरूपाचे हे गुन्हे आहेत. मनोज धुमाळ (रा. चिंचवड), प्रतीक सांगळे (रा. भेकराईनगर, फुरसुंगी, हडपसर), प्रसाद पानसरे, वैजनाथ भगत (रा. मांजरी) यांच्यासह दीडशे जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संगणक अभियंता मोहसीन शेख खूनप्रकरणी कारागृहात असलेल्या देसाईला शनिवारी उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला. त्यानंतर त्याची मिरवणूक काढल्याने वाहतूक विस्कळित झाली होती. देसाईचा जामीन रद्द करण्यासाठी पोलिसांकडून उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात येणार असल्याचे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. |