कोंढव्यात बेकायदा इमारत पाडली

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 5 एप्रिल 2019

रहिवाशांसमोर पेच 
घर घेताना इमारत अधिकृत असल्याचे बांधकाम व्यावसायिकाने दाखविले होते. त्यामुळेच आम्ही घर घेतले, पण इमारती बेकायदा असल्याने आमची फसवणूक झाली आहे. हे बांधकाम बेकायदा आहे, याची माहिती महापालिकेला नव्हती का, असा प्रश्‍न इमारतीतील रहिवासी आसिया शेख यांनी उपस्थित केला. तेव्हा आता आम्ही राहायचे कुठे, आमच्या नुकसानीला जबाबदार कोण? असे अनेक प्रश्‍न शेख स्वत:लाच विचारतानाच त्यांच्या डोळ्यांतील अश्रू थांबत नव्हते.

पुणे/ गोकुळनगर - कोंढव्यातील (खु.) खांब खचून धोकादायक झालेल्या पाच मजली इमारतीवर महापालिकेने गुरुवारी रात्री हातोडा उगारला. या वेळी रहिवाशांनी आक्रमक पवित्रा घेतल्याने कारवाईदरम्यान प्रचंड गोंधळ उडाला.

महापालिकेचे अधिकारी-रहिवाशांमध्ये वादही झाला. परंतु पोलिस बंदोबस्तात ही इमारत पाडली. त्याआधी सर्व सदनिकांमधील साहित्य बाहेर काढल्याचे महापालिका प्रशासनाने सांगितले. दरम्यान, बांधकाम व्यावसायिकाविरोधातही रहिवाशांनी कोंढवा ठाण्यात तक्रार दिली असून, महापालिकेनेही बांधकामविरोधात कारवाईची मागणी केली आहे. 

येथील संत ज्ञानेश्‍वरनगरमधील शबाना मंजिल या इमारतीच्या पायावरील खांब खचल्याने ती धोकादायक झाली होती.  त्यामुळे इमारतीतील आणि परिसरातील रहिवाशांना धोका होता. त्यामुळे १६ सदनिकांतील रहिवाशांना इतरत्र हलवून, घरांमधील साहित्य काढण्याच्या सूचना दिल्या होत्या. ही इमारत बेकायदा असल्याचे उघड होऊनही घटनेनंतर दोन दिवस महापालिकेच्या बांधकाम खात्याने कारवाई केली नव्हती. मात्र, गुरुवारी सायंकाळी सातच्या सुमारास महापालिकेच्या बांधकाम खात्यातील अधिकारी-कर्मचाऱ्यांचे पथक घटनास्थळी पोचले. एस्केव्हेटरच्या (जेसीबी) आणि अन्य यंत्रणा पाहून रहिवासी एकत्र आले आणि त्यांनी कारवाईला विरोध केला. त्यावरून अधिकारी-रहिवाशांमध्ये खटका उडाला. त्यामुळे कारवाईत अडथळे निर्माण झाले, त्यानंतर महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी जादा पोलिस मागवून इमारत पाडण्यास सुरवात केली.

इमारत बेकायदा होती. त्यामुळे पाडली. त्याबाबत रहिवाशांना कल्पना दिली होती. या भागातील अन्य बांधकामांवरही कारवाई  होणार आहे. ती यापुढेही सुरू राहील.
- नामदेव गंभिरे, कार्यकारी अभियंता, बांधकाम खाते, पुणे महापालिका

Web Title: Crime on Illegal Building Encroachment