गुन्हे झाले कमी अन्‌ अपघातही घटले!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 16 मे 2019

शहरातील कायदा सुव्यवस्था राखतानाच महिला, मुले आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी पोलिसांकडून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. गुंडगिरीचा बीमोड करतानाच शहरात सुरक्षितता प्रस्थापित करण्याच्या पोलिसांच्या प्रयत्नाला यश येत आहे. 
- डॉ. के. वेंकटेशम, पोलिस आयुक्त, पुणे

शहरातील गंभीर गुन्हे तसेच प्राणांतिक अपघातांमध्ये घट होतानाच गुन्हे उघडकीस येण्याचे प्रमाण आणि गुन्हेगारांना शिक्षा होण्याचेही प्रमाण वाढले आहे, असा दावा शहर पोलिसांनी केला आहे. गेल्यावर्षी ३१ जुलैला पुण्याच्या पोलिस आयुक्तपदाची सूत्रे के. व्यंकटेशम यांनी हाती घेतल्यावर ज्येष्ठ नागरिक, महिला, मुले यांच्यासाठीही अनेक उपक्रम राबविले आहेत. संघटित प्रयत्नांमुळेच शहरातील कायदा सुव्यवस्था अबाधित आहे, असे त्यांचे म्हणणे असले, तरी रस्त्यावरील गुंडगिरी, महिलांच्या छेडछाडीबाबत पोलिसांनी कठोर पावले उचलण्याची गरज आहे.

     पोलिस नियंत्रण कक्षाकडे गेल्या पाच महिन्यांत ३५५२ नागरिकांचे दूरध्वनी आले. व्यक्तिगत समस्या सोडविण्यासाठी सर्वाधिक १०८२, तर अन्य समस्यांसाठी १०५५ नागरिकांनी पोलिसांकडे मदत मागितली आहे. वाहतुकीच्या कोंडीबाबत ३७१, तर उपद्रवी घटकांबाबत ३९७ तक्रारींचा त्यात समावेश आहे. 

    सायबर क्राइमबाबत जागरूकता करण्यासाठी यंदा १२ बैठकांच्या माध्यमातून १४०० विद्यार्थ्यांशी, तर गेल्यावर्षी १० हजार ५५१ विद्यार्थ्यांपर्यंत पोलिस पोचले.

     खून, खुनाचा प्रयत्न, दंगल, जबर दुखापत, बलात्कार, लैंगिक छळ, दरोडा, जबरी चोरी, घरफोड्या, वाहनचोरी, इतर चोऱ्या आदी विविध प्रकारचे गुन्हे 
४ ते १२२ टक्‍क्‍यांनी गेल्या वर्षीच्या तुलनेत घटले आहेत. 

    सातत्याने गुन्हे करणाऱ्या शहरातील सुमारे ७ हजार गुन्हेगारांचे क्रिमिनल इंटेन्सिव्ह सर्व्हिलन्स प्रोजेक्‍ट (क्रिस्प) अंतर्गत पोलिसांनी जिओटॅगिंग केले आहे. या गुन्हेगारांची सर्व माहिती डिजिटल स्वरूपात सर्व पोलिस ठाण्यांमध्ये आहे. 

     गुन्ह्यांबाबतच्या नागरिकांच्या ७८ टक्के तक्रार अर्जांवर गेल्यावर्षी, तर यंदाच्या मे महिन्यापर्यंत त्यातील ७८ टक्के अर्जांवर यशस्वी प्रक्रिया झाली आहे. एकूण प्रलंबित अर्जांवरही ९८ टक्के प्रक्रिया पूर्ण झाली आहे. 

    सायबर क्राइम वाढत असून गेल्यावर्षी ५५२४ अर्ज आले होते, त्यातील ४८६१ अर्जांवर प्रक्रिया झाली आहे. गेल्या पाच महिन्यांत २२०१ अर्जांपैकी १९५८ अर्जांवर प्रक्रिया झाली आहे. 

     पोलिस नियंत्रण कक्षात आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेतल्यावर रोजच्या २१ हजार कॉलवरून हे प्रमाण १००० कॉलवर आले आहे. त्यामुळे पूर्वी २४ ऐवजी आता फक्त ६ कर्मचारी तेथे आहेत.  

    शहरात ११ हजार ३४९ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. तर, १६०१५ खासगी कॅमेरे आहेत. गुन्ह्यांना अटकाव आणि तपास करण्याबरोबरच वाहतूक नियमनासाठीही त्यांचा वापर होत आहे. 

     पाचपेक्षा जास्त अपघात ज्या ठिकाणी झाले आहेत, असे १८ ब्लॅक स्पॉटस शोधून तेथे सुधारणा व्हावी, यासाठी महापालिकेकडे पाठपुरावा सुरू आहे.

     ज्येष्ठ नागरिकांच्या बहुतांश अर्जांवर ‘भरोसा सेल’मार्फत प्रक्रिया सुरू आहे. 

    १७४ पोलिस कर्मचाऱ्यांना ‘पोलिस काका’ म्हणून ८१७ शाळांसाठी नियुक्त करण्यात आले आहे.

    महिलांच्या सुरक्षितततेबाबत पोलिसांच्या ‘बडी कॉप’ या ॲपमार्फत ४५६ व्हॉट्‌स अप ग्रुप असून त्यात ३६ हजार ३९६ महिलांचा समावेश आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Crime Less and Accident Decrease Police Commissioner