
मुलीचा संसार चांगला व्हावा, यासाठी आई-वडिलांनी कोट्यवधी रुपये खर्च करुन मानपान करून मुलीचे लग्न करून दिले
Crime News : पुण्यातील विवाहितेचा अमेरिकेत छळ, पोलिसांच्या मदतीने सुटका
पुणे : मुलीचा संसार चांगला व्हावा, यासाठी आई-वडिलांनी कोट्यवधी रुपये खर्च करुन मानपान करून मुलीचे लग्न करून दिले. परंतु पतीने विवाहित तरुणीचा अमेरिकेत छळ सुरु केला. अखेर या तरुणीने अमेरिकन पोलिसांच्या मदतीने स्वत:ची कशीबशी सुटका करुन घेतली.
याप्रकरणी ३३ वर्षीय विवाहितेने डेक्कन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पतीसह नातेवाइकांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार अमेरिका आणि नवी मुंबईतील खारघरमध्ये १ डिसेंबर २०२२ पासून सुरू होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणीचा दोन्ही परिवाराच्या संमतीने आंतरजातीय विवाह झाला. साखरपुड्यात फिर्यादीच्या वडिलांनी १० लाखांचा खर्च केला. लग्नात हुंडा म्हणून ५० हजार डॉलर दिले. याशिवाय, सासू आणि पतीच्या दोन्ही बहिणींना प्रत्येकी पाच तोळ्यांचा सोन्याचा हार दिला.
लग्नानंतर नणंदेचा पती विवाहित तरुणीला धर्मांतरासाठी दबाव टाकत होता. परंतु तिने त्याला स्पष्ट नकार दिला. नणंद आणि पतीच्या छळामुळे ती माहेरी पुण्यात आली. त्यानंतर तिचा पती अमेरिकेस निघून गेला.
दरम्यान, साखरपुड्यात पतीच्या जुळ्या भावाच्या वागणुकीवरून विवाहितेने कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. ही तक्रार मागे घ्यावी, यासाठी पतीने तिला आपण चांगला संसार करू, असे सांगून अमेरिकेत बोलावून घेतले. त्यावर विश्वास ठेवून विवाहित तरुणी १४ फेब्रुवारीला अमेरिकेला गेली.
परंतु माझ्या भावाविरोधात दिलेली तक्रार मागे घेतली तरच मी तुला नांदवतो, असे म्हणून तिचा छळ सुरू केला. त्याला कंटाळून विवाहित तरुणीने अमेरिकन पोलिसांना कॉल करुन मदत मागितली. पोलिसांनी तिच्या पतीला अटक केली. अखेर वडिलांनी अमेरिकेला जाऊन मुलीला पुण्यात आणल्यानंतर त्यांनी डेक्कन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.