
Crime News : मध्य प्रदेशमधून आणलेले तब्बल १७ पिस्टल पोलिसांनी पकडले; आरोपी...
पुणे : पुण्यात अवैधरीत्या गावठी पिस्टलची विक्री करणाऱ्या ७ सराईत आरोपींना पोलिसांनी केली अटक केली आहे. या ७ जणांकडून १७ पिस्टलसह १३ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली.
पुणे पोलिसाच्या गुन्हे शाखेच्या युनिट ६ने ही कारवाई केली. आरोपींनी मध्य प्रदेश मधून हे गावठी पिस्टल आणले होते. मिळालेल्या माहितीनुसार, २ पिस्टल विक्री करणारे तरुण वाघोली भागात असलेल्या एका लॉज वर वास्तव्यास असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या अनुषंगाने पोलिसांनी सापळा रचून या २ जणांना ताब्यात घेतले असता त्यांच्याजवळ असलेली १ गावठी पिस्टल आणि २ जिवंत काडतुसे मिळून आले.
अधिक चौकशी केली असता त्यांच्याकडून पिस्टल घेणाऱ्या तरुणांना देखील पोलिसांनी अटक केली. हे सगळे जण अहमदनगर जिल्ह्यातील आहेत. या आरोपींकडून १३ गावठी बनावटीच्या पिस्टल यासह ४ जिवंत काडतुसे तसेच एक चार चाकी, मोबाईल असा २१ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
हनुमंत गोल्हार (२४), प्रदीप गायकवाड (२५), अरविंद पोटफोडे (३८), शुभम गरजे (२५), ऋषिकेश वाघ (२५), अमोल शिंदे (२५) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. दुसऱ्या कारवाईत, सुसगाव या ठिकाणी पोलिसांनी साहिल चांदेरे (२१) याच्याकडून ४ पिस्टलसह ९ जिवंत काडतुसे असा २,४९,००० रुपयंचा ऐवज जप्त केला आहे.