इराणी तरुणीला डांबून सिगारेटचे चटके

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 26 डिसेंबर 2018

पुणे - मुंबईतील नामवंत उद्योजकाचा मुलगा आणि एका प्रसिद्ध अभिनेत्रीच्या सावत्र भावाने एका इराणी तरुणीबरोबर प्रेमसंबंध निर्माण करून तिला घरामध्ये डांबून ठेवत एक महिना अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. तरुणीला सिगारेटचे चटके देत, मारहाण केल्याप्रकरणी कोरेगाव पार्क पोलिसांनी सोमवारी रात्री उशिरा संबंधित व्यक्तीला अटक करत तरुणीची सुटका केली.

पुणे - मुंबईतील नामवंत उद्योजकाचा मुलगा आणि एका प्रसिद्ध अभिनेत्रीच्या सावत्र भावाने एका इराणी तरुणीबरोबर प्रेमसंबंध निर्माण करून तिला घरामध्ये डांबून ठेवत एक महिना अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. तरुणीला सिगारेटचे चटके देत, मारहाण केल्याप्रकरणी कोरेगाव पार्क पोलिसांनी सोमवारी रात्री उशिरा संबंधित व्यक्तीला अटक करत तरुणीची सुटका केली.

धनराज ऊर्फ बाबा अरविंद मोरारजी (वय ४८, रा. मित ऑलम्पस सोसायटी, कोरेगाव पार्क) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी एका तीस वर्षीय इराणी तरुणीने कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी ही इराणमधील तेहरान येथील रहिवासी आहे. पुण्यात हॉटेल व्यवस्थापन अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर तिने काही महिने इराणमध्ये काम केले. त्यानंतर तिने पुन्हा एक वर्षापूर्वी विद्यार्थी व्हिसावर पुण्यात येऊन महात्मा गांधी रस्त्यावरील एका खासगी संस्थेमध्ये कॉम्प्युटर सॉफ्टवेअर कोर्सला प्रवेश घेतला. तेथे शिक्षण घेत असतानाच एका मैत्रिणीमार्फत तिची धनराजबरोबर ओळख झाली. त्याने तिच्याशी प्रेमसंबंध निर्माण केले. तरुणीची आर्थिक परिस्थिती कमकुवत असल्याने धनराजने तिचा सर्व खर्च करण्याची तयारी दर्शविली.

काही महिन्यांपासून धनराज व इराणी तरुणी कोरेगाव पार्कमधील धनराज याच्या सदनिकेमध्ये राहत होते. काही दिवस धनराजने तिला चांगली वागणूक दिली. त्यानंतर तिच्याशी वाद घालून मारहाण करण्यास सुरवात केली. तिला सिगारेटचे चटके देऊन जखमी केले. या प्रकाराबाबत लोकांना कळू नये, यासाठी तिला घरामध्येच डांबून ठेवले. या सर्व प्रकारामुळे त्रस्त झालेल्या तरुणीने तिच्या मैत्रीणीशी संपर्क साधला. त्यानंतर मैत्रीणीने एका महिला पत्रकारामार्फत पोलिसांशी संपर्क साधला. त्यानंतर धनराजच्या सदनिकेची तपासणी करून, तरुणीची सुटका केली.

धनराज हा मुंबईतील एका बड्या उद्योजकाचा मुलगा आहे. तसेच एका प्रसिद्ध अभिनेत्रीचा तो सावत्र भाऊ आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक विद्या राऊत करत आहेत.

धनराज मोरारजी याने तरुणीशी मैत्री वाढवून, तिला त्याच्या घरी आणले. त्यानंतर तिच्यावर अत्याचार सुरू केले. हा प्रकार तिने मैत्रिणीला कळविल्यानंतर सोमवारी रात्री पोलिसांनी तिची सुटका केली. तसेच मोरारजी यास अटक केली.
- मदन बहाद्दरपुरे, पोलिस निरीक्षक, कोरेगाव पार्क पोलिस ठाणे

Web Title: Crime Police