रस्त्यावरील गुन्हेगारीत वाढ

अनिल सावळे - @AnilSawale
शुक्रवार, 16 डिसेंबर 2016

पुणे - शहरात रस्त्यावरून जाताना किरकोळ कारणावरून वाद झाला तर समोरची व्यक्ती हत्याराने कधी मारहाण करेल, याचा नेम राहिलेला नाही. गेल्या काही दिवसांत सोनसाखळी चोरीच्या घटनांसोबतच रस्त्यावर गुंडगिरीचे प्रकार वाढले आहेत. गुन्हेगार रस्त्यावर मोकाट फिरत असून, त्यामुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. अशा प्रसंगी पोलिस बीट मार्शल कोठे असतात, असा प्रश्‍न नागरिक विचारत आहेत.

पुणे - शहरात रस्त्यावरून जाताना किरकोळ कारणावरून वाद झाला तर समोरची व्यक्ती हत्याराने कधी मारहाण करेल, याचा नेम राहिलेला नाही. गेल्या काही दिवसांत सोनसाखळी चोरीच्या घटनांसोबतच रस्त्यावर गुंडगिरीचे प्रकार वाढले आहेत. गुन्हेगार रस्त्यावर मोकाट फिरत असून, त्यामुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. अशा प्रसंगी पोलिस बीट मार्शल कोठे असतात, असा प्रश्‍न नागरिक विचारत आहेत.

पोलिस आयुक्‍त रश्‍मी शुक्‍ला आणि सहआयुक्‍त सुनील रामानंद यांनी सराईत गुन्हेगारांविरुद्ध संघटित गुन्हेगारी नियंत्रण (मोका) आणि एमपीडीएनुसार कारवाई करून तीनशेहून अधिक सराईत गुन्हेगारांना तुरुंगाचा रस्ता दाखविला. मात्र, आता रस्त्यावर, महाविद्यालयाच्या परिसरात टपोरीगिरी करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. नागरिकांना रस्त्यात अडवून लूटमार करण्याचे प्रकारही घडत आहेत. किरकोळ कारणावरून वाद झाल्यानंतर साथीदार गुंडांना बोलावून नागरिकांना मारहाण करत आहेत. अशा घटनांमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. अशा गुंडगिरीवर आवर घालण्यासाठी रश्‍मी शुक्‍ला आणि सुनील रामानंद यांनी स्वत: गांभीर्याने लक्ष घालावे, अशी मागणी नागरिक करीत आहेत.

स्वारगेट - सारसबाग चौपाटीवर एका महिलेच्या पायाला मोटारीचा धक्‍का लागला. त्यावर ‘गाडी नीट चालविता येत नाही का’, असे विचारणारे त्या महिलेचे पती मिलिंद पाटील यांना पाच-सहा गुंडांनी लाथा-बुक्‍क्‍यांनी आणि प्लॅस्टिकच्या खुर्च्यांनी बेदम मारहाण केली. 

खडकी - राहुल पिल्ले हा तरुण त्याच्या मित्रासमवेत टी. जे. महाविद्यालयापासून दुचाकीवर जात होता. त्यांना दोन गुंडांनी रस्त्यात अडवून तलवार आणि कोयत्याचा धाक दाखवून पैशांची मागणी केली. तसेच, दुचाकीचे इंडिकेटर तोडून दहशत निर्माण केली.

बाजीराव रस्ता - नूमवि शाळेजवळून घरी जाणारा मूकबधिर तरुण योगेश वान याला अडवून ३० हजार रुपयांचा मोबाईल हिसकावून नेला. 

वानवडी - तरवडे वस्तीमध्ये दत्ता मोरे हा तरुण कामावर जात होता. त्या वेळी १७ वर्षांच्या मुलाने पाठीमागून येऊन डोक्‍यात कोयत्याने वार करून त्याला गंभीर जखमी केले.

बंडगार्डन - विशाल धायगुडे हा १९ वर्षांचा तरुण मालधक्‍का चौकात पदपथावर उभा होता. त्या वेळी तीन गुंडांनी रेल्वे स्टेशन कोठे आहे, असे विचारत मोबाईल हिसकावून पसार झाले. तसेच, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काशिनाथ काळे या तरुणास एका तृतीय पंथीयासह तिघांनी मारहाण केली.

खडक - शुक्रवार पेठेत मोटारीला खरचटल्याच्या कारणावरून कामगारांना शिवीगाळ केली. त्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या हृषीकेश गौड यांना सात तरुणांनी मिळून लाथा-बुक्‍क्‍यांनी मारहाण केली.

वारजे - चैतन्य चौकात दहा ते बारा गुंड दुचाकीवरून हातात कोयते आणि लाकडी दांडके घेऊन आले. त्यांनी दहशत निर्माण करून मोटार आणि टेंपोची तोडफोड केली. त्याच दिवशी वारजे येथील यशोदीप चौकात गुंडांनी हातात कोयते आणि दांडके घेऊन रस्त्यावरून येणाऱ्या-जाणाऱ्यांना धमकावले.

हडपसर - मगरपट्टा रस्त्यावरील मगर पेट्रोलपंपावर इंधन भरण्यासाठी आलेल्या तरुणास मशिनजवळ थुंकू नको, असे कामगाराने समजावून सांगितले. त्यावर त्याने लगेच इतर पाच-सहा साथीदारांना बोलावून पेट्रोलपंपाच्या व्यवस्थापकासह कामगारास मारहाण केली. 

पोलिस गस्त वाढविण्याची गरज
सोनसाखळी चोरीच्या घटना तसेच रस्त्यावरील गुंडगिरी रोखण्यासाठी पोलिस गस्त वाढविण्याची गरज आहे. ‘व्हिजिबल पोलिसिंग’ची संकल्पना चांगली असून, त्यावर अधिक भर देणे अपेक्षित आहे. 

Web Title: crime on road