श्रीनाथ भिमाले, अरविंद शिंदे यांच्यावर अदखलपात्र गुन्हा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 25 मे 2018

पुणे - महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत अतिक्रमण निरीक्षकावरून सभागृह नेते श्रीनाथ भिमाले आणि कॉंग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांच्यात झालेला वाद आता पोलिसांपर्यंत गेला आहे. शिंदे यांनी भिमाले यांच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर गुरुवारी भिमाले यांनी शिंदे यांच्याविरोधात बदनामीची तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे भिमाले आणि शिंदे या दोघांच्या विरोधात शिवाजीनगर पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे.

मार्केट यार्ड परिसरात अतिक्रमण कारवाई केल्याच्या कारणावरून अतिक्रमण विभागातील किशोर पडळ या निरीक्षकास महापालिकेत मारहाण झाली होती. या प्रकरणी मारहाण करणाऱ्यावर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर मारहाण झालेल्या निरीक्षकावर मार्केट यार्ड येथील एका हॉटेल मालकाने खंडणीचा गुन्हा दाखल केला. त्यावरून महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत भिमाले आणि शिंदे यांच्यात वाद झाले होते. त्यानंतर भिमाले यांनी जाणीवपूर्वक बदनामी केल्यामुळे त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करावा, अशी तक्रार शिंदे यांनी पोलिसांकडे दिली होती. त्यानुसार भिमाले यांच्याविरुद्ध शिवाजीनगर पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणावर चर्चा सुरू असताना "अरविंद शिंदे यांनी मला उद्देशून तुमचे मानसिक संतुलन बिघडले आहे का?,' असे वक्तव्य करून माझी बदनामी केली आहे. त्यामुळे कॉंग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी तक्रार भिमाले यांनी दिली. त्यानुसार शिंदे यांच्याविरुद्ध शिवाजीनगर पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: crime on shrinath bhimale arvind shinde