
कांचन पाटील आणि अमरनाथ पाटील यांचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला
पुणे : बीटकॉईन (क्रिप्टोकरन्सी) या आभासी चलन फसवणूक प्रकरणात अटकेत असलेले माजी आयपीएस अधिकारी रवींद्रनाथ प्रभाकर पाटील यांची पत्नी आणि भावाचा अटकपूर्व जामीन अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. पोलिस कोठडीत चौकशी न करता गुन्ह्याचा तपास पूर्ण होवू शकत नाही, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे.पाटील यांची पत्नी कांचन रवींद्रनाथ पाटील आणि भाऊ अमरनाथ प्रभाकर पाटील यांनी सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. हा अर्ज अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. बी. साळुंखे यांनी फेटाळला.
बिटकॉईन या आभासी चलनाच्या फसवणूक प्रकरणात पोलिसांना तांत्रिक मदत करण्यासाठी नेमलेले सायबर तज्ञ पंकज प्रकाश घोडे (वय ३८, रा. ताडीवाला रोड) आणि पाटील (वय ४५, रा. बिबवेवाडी) यांना पोलिसांनी अटक केली होती. तर पाटील यांच्या पत्नी व भावावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यात अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी दोघांनी न्यायालयात धाव घेतली होती. अर्जास सरकारी वकील उज्ज्वला रासकर यांनी विरोध केला. या गुन्ह्याद्वारे मिळवलेले पैसे पाटील यांनी पत्नी व भावाच्या बँक खात्यावर वर्ग केले आहेत. ही रक्कम मोठी असून त्याबाबत तपास करून पैसे जप्त करण्यासाठी दोघांना अटक करणे आवश्यक आहे. या गुन्ह्याची व्याप्ती असून पाटील पोलिस तपासात सहकार्य करीत नाही. गुन्ह्याच्या सखोल तपासासाठी दोन्ही आरोपींचा अर्ज फेटाळण्यात यावा, असा युक्तिवाद ॲड. रासकर यांनी केला.
पाटील यांच्यावतीने ॲड. रोहन नहार यांनी कामकाज पाहिले. पाटील यांच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम ४०९ नुसारचा गुन्हा लागू होत नाही. कारण ते ना सरकारी कर्मचारी नाही ना बँक कर्मचारी. आयटी ॲक्टनुसार दाखल असलेले कलमे हे जामीनपात्र आहेत. त्यामुळे आरोपींना गुन्ह्यात अडकविण्यासाठी भारतीय दंड संहितेनुसार कारवार्इ करण्यात आली आहे, असा युक्तिवाद ॲड. नहार यांनी केला. न्यायालयीन कोठडी मंजूर झाल्यानंतर पाटील यांनी जामीनासाठी अर्ज केला आहे. त्यावर गुरुवारी (ता. ३१) निकाल होणार आहे. या गुन्ह्याचा तपास पोलिस निरीक्षक अंकुश चिंतामण करीत आहेत.
Web Title: Crime Update Bitcoin Case Court Rejected Bail Of Kanchan Patil And Amarnath Patil Pune
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..