
Pune Crime : तीन हजार रुपयांसाठी संगणक अभियंत्याचा खून; आरोपी अटकेत
Pune News: पुणे- नगर रस्त्यावरील वाघोलीतील संगणक अभियंत्याच्या खूनप्रकरणी लोणीकंद पोलिसांनी एका मोटारचालकाला अटक केली.
केवळ तीन हजार रुपयांसाठी संगणक अभियंत्याचा शस्त्राने गळा चिरून खून केल्याची बाब पोलिस तपासात समोर आली आहे.
गौरव सुरेश उदासी (वय ३२, रा. खराडी, मूळ रा. रामपुरी, अमरावती) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.
भगवान केंद्रे (वय २३, रा. परतापूर, ता. कळंब, जि. धाराशिव) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याचा साथीदार पसार झाला असून, त्याचा शोध घेण्यात येत आहे. या प्रकरणी लोणीकंद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोहगाव-भावडी रस्त्यावर डोंगराच्या पायथ्याशी शनिवारी दुपारी एका तरुणाचा मृतदेह पडल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
डोंगराच्या पायथ्याजवळ गौरवची दुचाकी आढळून आली. त्यावरून पोलिसांनी त्याची ओळख पटविली. गौरव हा खराडी येथील एका आयटी कंपनीत नोकरीस होता.
खराडी परिसरातील एका सोसायटीमध्ये गौरव मित्रांसमवेत राहत होता. शुक्रवारी (ता. १३) रात्री तो जेवण करण्यासाठी जात असल्याचे सांगून तो घराबाहेर पडला. (Marathi Tajya Batmya)
परंतु, रात्री उशिरापर्यंत तो परतला नाही. या संदर्भात लोणीकंद पोलिसांनी आरोपीला शनिवारी कळंब तालुक्यातील परतापूर येथून अटक केली. पुढील तपास पोलिस निरीक्षक (गुन्हे) मारुती पाटील करीत आहेत.
आरोपीकडे ॲपवरुन मोटारीची नोंदणी
गौरवने ॲपवरुन आरोपी भगवान याच्याकडे मोटारीची दोन वेळा नोंदणी केली होती. गौरव हा भगवानला तीन हजार रुपये देणे लागत होता. (Latest Marathi News)
वेळेवर पैसे परत न केल्यामुळे भगवानने त्याला शुक्रवारी रात्री बोलावून घेतले. तेथे त्यांच्यात वादावादी झाली. त्यावेळी भगवान आणि त्याच्या साथीदाराने गौरवच्या गळ्यावर शस्त्राने वार करून खून केल्याचे पोलिस तपासात समोर आले.