वाहनचोरीच्या वाढत्या गुन्ह्यांची डोकेदुखी

संदीप जगदाळे
शुक्रवार, 28 एप्रिल 2017

हडपसर - परिसरात दुचाकी व चारचाकी वाहनांच्या चोऱ्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. वाहनांची वाढती संख्या, अधिकृत पार्किंगचा अभाव, नागरिकांचा निष्काळजीपणा ही या गुन्ह्यांची मुख्य कारणे आहेत. याशिवाय वाहनचोरी ही सगळ्यात सोपी चोरी असल्याने या गुन्ह्यात बालगुन्हेगारांची वाढती संख्या असल्याचे उघड झाले आहे. 

हडपसर - परिसरात दुचाकी व चारचाकी वाहनांच्या चोऱ्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. वाहनांची वाढती संख्या, अधिकृत पार्किंगचा अभाव, नागरिकांचा निष्काळजीपणा ही या गुन्ह्यांची मुख्य कारणे आहेत. याशिवाय वाहनचोरी ही सगळ्यात सोपी चोरी असल्याने या गुन्ह्यात बालगुन्हेगारांची वाढती संख्या असल्याचे उघड झाले आहे. 

हडपसर पोलिस ठाण्याच्या हद्दीत सन २०१४ मध्ये १९६, २०१५ मध्ये २२९, तर २०१६ मध्ये २३६ आणि गेल्या तीन महिन्यांत ६८ वाहने चोरीला गेली आहेत. या तिन्ही वर्षांत चोरीला गेलेल्या वाहनांचा आलेख वाढता आहे. सन २०१४ मध्ये २९, २०१५ मध्ये ६८ आणि २०१६ मध्ये २३६, तर गेल्या तीन महिन्यांत १५ चोरीला गेलेल्या वाहनांचा शोध पोलिसांनी लावला आहे. गेल्या तीन वर्षांत चारचाकी वाहने चोरीला जाण्याचे प्रमाणदेखील वाढत आहे. हडपसर पोलिस ठाण्याला १८१ कर्मचारी मंजूर आहेत. प्रत्यक्षात १४० कर्मचारीच कार्यरत आहेत. पोलिस ठाण्याची हद्द वाढल्याने पुरेसे मनुष्यबळ मिळाल्यास पोलिसांना अधिक चांगले काम करणे शक्‍य होईल.

हडपसर भाजी मंडई, मगरपट्टा व गाडीतळ उड्डाण पुलाखाली पार्किंग केलेली वाहने, नोबेल रुग्णालय परिसर, काळेपडळ, ससाणेनगर ही वाहनचोरीची प्रमुख केंद्रे आहेत. बाजारपेठ व वर्दळीच्या ठिकाणी महापालिकेचे एकही अधिकृत पार्किंग नसणे, रहिवाशांना वाहने लावण्यासाठी जागा नसल्याने रस्त्यावर अथवा मोकळ्या मैदानावर वाहने असुरक्षितपणे पार्किंग करणे, गाडीलाच चावी विसरून जाणे, सोसायटीतील सुरक्षारक्षकाचे दुर्लक्ष तसेच सीसीटीव्ही यंत्रणा नसणे, वाहनाचे लॉक नादुरुस्त होऊन अन्य वाहनाची चावी बसणे आदी प्रमुख कारणांमुळे वाहन चोऱ्यांचे प्रमाण वाढले असल्याचे निष्पन्न झाले आहे. 

हडपसर पोलिसांकडून केली जाणारी नाकाबंदी, साध्या वेशात पेट्रोलिंग, रेकॉर्डवरील गुन्हेगारांची वेळोवेळी चौकशी, सोसायट्या व व्यावसायिकांना सीसीटीव्ही लावण्यास प्रवृत्त करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. तसेच काळेपडळ रेल्वे गेट, पंधरा नंबर रेल्वे गेट, ससाणेनगर रेल्वे गेट, मंतरवाडी, झेड प्लस हॉटेल आणि फुरसुंगी पोलिस चौकी परिसरात नियमितपणे नाकाबंदी लावली जात असल्याने वाहन चोरांना लगाम बसण्यास मदत होत आहे; मात्र नागरिकांनीदेखील आपल्या वाहनांच्या सुरक्षिततेची काळजी घेऊन पोलिसांना सहकार्य करण्याची गरज आहे. 

हडपसर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विष्णू पवार व सहायक पोलिस निरीक्षक संदीप देशमाने म्हणाले, ‘‘वाहनचोरीस प्रतिबंध घालण्यासाठी आपले वाहन सुरक्षित ठिकाणी पार्क करून ते लॉक झाले असल्याची खात्री करावी. वाहनांना जीपीआरएस, डिस्क लॉक, सेंट्रल लॉक, थेप्ट अलार्म यांसारख्या यंत्रणा बसविणे आवश्‍यक आहे. तसेच बाजारपेठेत महापालिकेचे अधिकृत पार्किंग उभारण्याची आवश्‍यकता आहे. वाहनचोरी उघड होण्याचे प्रमाण गेल्या दोन वर्षांत वाढले आहे; मात्र नागरिकांनी वाहनचोरी होणारच नाही, या दृष्टीने खबरदारी घेणे आवश्‍यक आहे.’’

Web Title: crime vehicle theft