मुख्याध्यापकास मारहाणप्रकरणी एकास अटक

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 19 ऑक्टोबर 2016

सोमेश्‍वरनगर - कांबळेश्‍वर (ता. बारामती) येथे एका मद्यपी तरुणाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत जाऊन शाळेच्या मुख्याध्यापकास मारहाण करण्याचा व इतर शिक्षकांनाही शिवीगाळ करण्याचा प्रकार केला. याप्रकरणी नितीन वाघमारे याच्यावर वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी न्यायालयाने वाघमारे याला जामीन मंजूर केला आहे. कांबळेश्‍वर येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सोमवारी सकाळी दहा वाजता शाळा व्यवस्थापन समितीची बैठक होऊन शंकर मदने यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली. यानंतर दुपारी दारूच्या नशेत नितीन वाघमारे शाळेत शिरला आणि अध्यक्षपदाच्या निवडीवरून मुख्याध्यापकांना शिवीगाळ सुरू केली. याप्रसंगी त्याने मुख्याध्यापकांना मारहाण केली. तसेच मध्यस्थी करू पाहणारे शिक्षक सचिन लवंगारे, शिक्षिका निर्मला खताळ, मनीषा जाधव यांनाही दमदाटी व शिवीगाळ केली. याप्रकरणी वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यात काल दमदाटी, शिवीगाळ, मारहाण व सरकारी कामात अडथळा असे गुन्हे वाघमारे याच्यावर दाखल करण्यात आले आहेत.

शिक्षक समितीकडून कारवाईची मागणी
मुख्याध्यापकांना मारहाण व शिक्षकांना शिवीगाळ करणाऱ्या प्रकरणाचा पुणे जिल्हा शिक्षक समितीने तीव्र निषेध केला आहे. जिल्हाध्यक्ष नंदकुमार होळकर यांनी सहायक पोलिस निरीक्षक सचिन पाटील यांच्याशी भेटून कडक कारवाईची मागणी केली. होळकर म्हणाले, 'पंचायत समितीच्या सभापतींच्या गावातच प्रकार घडल्याने शिक्षकांमध्ये असुरक्षिततेचे वातावरण तयार झाले आहे. प्रशासनाने अशा घटनांना पायबंद घालावा. तसेच सध्याच्या घटनेची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी होळकर यांनी केली आहे.

Web Title: criminal arrested in headmaster beating

टॅग्स