खंडणीबहाद्दर आसिफ खानला ठोकल्या बेड्या 

अनिल सावळे 
शुक्रवार, 19 मे 2017

मुंबई-पुण्यासह पिंपरी-चिंचवड भागात नामांकित बिल्डरांना खंडणीसाठी धमक्‍यांचे सत्र सुरू होते. कुख्यात रवी पुजारी आणि सुरेश पुजारी टोळीतील हस्तकाकडून या धमक्‍या दिल्या जात होत्या. खंडणीसाठी कोंढव्यातील एका बिल्डरच्या कार्यालयावर गोळीबार करणाऱ्या तिघांपैकी आसिफ युसूफ खान हा फरारी होता. गुन्हे शाखेचे खंडणी विरोधी पथक त्याच्या मागावर होते. एपीआय सुनील गवळी आणि त्यांच्या पथकाने कौशल्याने तपास करीत खानला बेड्या ठोकल्या. 

मुंबई-पुण्यासह पिंपरी-चिंचवड भागात नामांकित बिल्डरांना खंडणीसाठी धमक्‍यांचे सत्र सुरू होते. कुख्यात रवी पुजारी आणि सुरेश पुजारी टोळीतील हस्तकाकडून या धमक्‍या दिल्या जात होत्या. खंडणीसाठी कोंढव्यातील एका बिल्डरच्या कार्यालयावर गोळीबार करणाऱ्या तिघांपैकी आसिफ युसूफ खान हा फरारी होता. गुन्हे शाखेचे खंडणी विरोधी पथक त्याच्या मागावर होते. एपीआय सुनील गवळी आणि त्यांच्या पथकाने कौशल्याने तपास करीत खानला बेड्या ठोकल्या. 

पुण्यातील पिंपरी-चिंचवड भागात कुख्यात रवी पुजारी आणि सुरेश पुजारी टोळीने एका बांधकाम व्यावसायिकाला खंडणी मागितली. याप्रकरणी पिंपरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यात पोलिसांनी सुरेश पुजारी टोळीचा हस्तक रवी घारे याला खंडणी विरोधी पथकाने अटकही केली. मात्र पोलिसांनी याच्या मुळापर्यंत जाण्याचे ठरविले. पोलिस आयुक्त रश्‍मी शुक्‍ला यांनी रवी पुजारी आणि सुरेश पुजारी टोळीतील रेकॉर्डवरील गुन्हेगारांचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार खंडणी विरोधी पथकाने सखोल तपास सुरू केला. 

सन 2008 मध्ये रवी पुजारीच्या सांगण्यावरून कोंढव्यातील एका बिल्डरच्या कार्यालयावर खंडणीसाठी गोळीबार झाला होता. गोळीबार करणाऱ्या सादिक बंगाली, किरण साळवी आणि आसिफ खान या तिघांपैकी आसिफ खान हा दोन वर्षांपासून जामिनावर बाहेर आल्यानंतर फरारी झाला होता. खान हा चंदननगर भागात वास्तव्यास असून, तो चंदननगर-खराडी बायपास परिसरात येणार असल्याची माहिती खंडणी विरोधी पथकातील सहायक पोलिस निरीक्षक सुनील गवळी यांना मिळाली. त्यानुसार 2 मे 2017 रोजी गुन्हे शाखेचे तत्कालीन पोलिस आयुक्त पी. आर. पाटील, सहायक पोलिस आयुक्त सुरेश भोसले यांच्या सूचनेनुसार दोन पथके तयार करण्यात आली. सहायक निरीक्षक सुनील गवळी, विठ्ठल शेलार, कर्मचारी प्रमोद मगर, प्रशांत पवार, फिरोज बागवान, संदीप दळवी, सचिन अहिवळे, मंगेश पवार, किरण चोरगे यांनी चंदननगर येथील झेन्सर कंपनीजवळ परिसरात सापळा रचला. पुणे पोलिसांनी खान याला आठ वर्षांपूर्वी अटक केली होती. त्याला पटकन ओळखणे जिकिरीचे होते. परंतु खंडणी विरोधी पथकातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी खान याला ओळखले. तेव्हा तो पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला. मात्र पोलिसांनी पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली तेव्हा त्याच्याकडे एक डबल बोर आणि डबल ट्रिगर गावठी रिव्हॉल्व्हर, मॅगेझिनसह गावठी पिस्तूल आणि आठ जिवंत काडतुसे असा शस्त्रसाठा पोलिसांच्या हाती लागला. 

आसिफ युसूफ खान हा कुख्यात गुन्हेगार सादिक बंगाली याचा साथीदार. सुरवातीच्या काळात रवी पुजारी याच्या सांगण्यावरून त्याने खंडणीसाठी नवी मुंबई येथील एकता बिल्डरच्या कार्यालयावर गोळीबार केला होता. या गुन्ह्यात मोका लागल्यानंतर त्याने पाच वर्षे कारागृहात काढली. 2013 मध्ये तो कारागृहातून बाहेर आला. त्यानंतर तो सादिक बंगालीसह रवी पुजारी आणि सध्या स्वतःची टोळी चालविणारा सुरेश पुजारीसाठी काम करीत होता. त्याच्यावर मुंबई, नवी मुंबई आणि पुण्यात खंडणीसाठी गोळीबार, अग्निशत्रे बाळगणे, वाहनचोरीचे गुन्हे दाखल आहेत. 

Web Title: criminal Asif Khan arrested