पुणे - विधानसभा निवडणुकीत शहरात कायदा-सुव्यवस्था व्यवस्थित राहावी, यासाठी पोलिसांनीही सराईत गुन्हेगारांची झाडाझडती घेण्यास सुरवात केली. गुन्हे शाखेच्या खंडणी पथकाने बुधवारी अनेक गुन्हेगारांना बोलावून घेऊन त्यांना "हिशेबात' राहा, असे बजावले.
राज्यामध्ये विधानसभेच्या निवडणुकांची तयारी जोरात सुरू आहे. अचारसंहिता लागू झाली नसली तरी राजकीय पक्षांनी त्यांचे उमेदवार ठरवणे, मतदारांपर्यंत पोचण्याच्या नियोजनासाठी गती आली आहे. प्रशासनही कामाला लागले आहे. निवडणुकीत अनेक गुन्हेगार सक्रिय होतात. काही उमेदवार तर गुन्हेगारांना सोबत घेऊनच प्रचारात उतरत असतात. त्यामुळे मतदारांवर प्रभाव पडतो. तसेच कायदा-सुव्यवस्थेचाही प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे गुन्हे शाखेने पुण्यातील प्रमुख टोळ्यांमधील गुन्हेगारांना व नव्याने गुन्हे दाखल झालेल्यांना खंडणी विभागाने हजेरीला बोलावले होते.
रेकॉर्डबरोबरच कुंडल्याही अद्ययावत
जुने रेकॉर्ड तपासतानाच गुन्हेगार काय करतो, कुठे रहातो, जवळचे नातेवाइक, मित्र यांची माहिती घेतलीच, शिवाय त्यांचे छायाचित्र घेऊन कुंडल्या अद्ययावत केल्या आहेत. सहायक आयुक्त डॉ. शिवाजी पवार म्हणाले, की विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुन्हेगार तपासणीचे काम सुरू आहे. याकाळात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक कारवाई सुरू आहे.
|