बारामतीतील सराईत गुन्हेगाराची निर्घृण हत्या

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 29 जून 2018

बारामती (पुणे) : शहरातील सराईत गुन्हेगार अक्षय उर्फ छोटा विमल कांतीलाल जमदाडे (वय 20, रा. जळोची, ता. बारामती) याची काल रात्री डोक्यात लाकडी दांडके मारुन निर्घृण हत्या करण्यात आली. पूर्ववैमनस्यातून ही हत्या झाल्याचा पोलिसांचा संशय असून या प्रकरणी नऊ जणांवर शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 

बारामती (पुणे) : शहरातील सराईत गुन्हेगार अक्षय उर्फ छोटा विमल कांतीलाल जमदाडे (वय 20, रा. जळोची, ता. बारामती) याची काल रात्री डोक्यात लाकडी दांडके मारुन निर्घृण हत्या करण्यात आली. पूर्ववैमनस्यातून ही हत्या झाल्याचा पोलिसांचा संशय असून या प्रकरणी नऊ जणांवर शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 

या संदर्भात फौजदार सुभाष मुंडे व पोलिस कर्मचारी अविनाश दराडे यांनी दिलेल्या माहितीनुसार काल रात्री साडेबाराच्या सुमारास जळोची परिसरातील बैलबाजारानजिक माळी चौकात ही हत्या झाली. अक्षय जमदाडे व त्याचा मित्र दीपक धर्मे हे दोघे मोटारसायकलवरुन निघाले असताना आमच्या घरावर दगडफेक का करतोस असा जाब त्याला काही जणांनी विचारला. मात्र आपण दगडे टाकलेली नाहीत तरिही मला जबाबदार का धरता असे म्हणत तुमच्याकडे बघून घेईन असे अक्षय याने म्हटल्यावर जाब विचारायला आलेल्या लोकांच्यात मारामारी सुरु झाली. या वेळी लाकडी दांडके व पाइपने अक्षयच्या डोक्यात जोरदार वार करण्यात आले तसेच त्याच्या संपूर्ण शरीरावर जबर मारहाण करण्यात आली. 

दरम्यान या भांडणाचा आवाज ऐकून अक्षयचे वडील कांतीलाल म्हस्कू जमदाडे हे भांडणे सोडविण्यास आले मात्र त्यांनाही मारहाण करण्यात आली. दीपक धर्मे यालाही मारहाण झाली. जखमी अवस्थेतील अक्षय जमदाडे यास दवाखान्यात नेल्यावर त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. या प्रकरणी अविनाश हौसराव देवकाते, हौसराव देवकाते, दत्तू गोफणे, सत्यवान उर्फ बगळ्या गोफणे, आबा ढाळे, दादा देवकाते, विकास उर्फ नाना मलगुंडे, योगेश गोफणे, प्रवीण गोफणे यांच्याविरुध्द शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या पैकी काही जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून इतरांचा शोध सुरु केला आहे. 

दरम्यान अक्षय जमदाडे याच्याविरुध्द बारामती शहर बारामती तालुका पोलिस ठाण्यात चोरी, मारामारी, खूनाचा प्रयत्न अशा स्वरुपाचे गंभीर गुन्हे दाखल होते, असेही पोलिसांनी सांगितले. 

Web Title: criminal killed in baramati