कामचुकार अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे - तानाजी सावंत

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 सप्टेंबर 2019

राज्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी राज्य सरकार चांगले निर्णय घेत असते. मात्र, अधिकाऱ्यांकडून त्या निर्णयांची तंतोतंत आणि प्रभावी अंमलबजावणी होत नाही. जे समाजाच्या हिताचे आहे, त्याकडे दुर्लक्ष करायचे आणि हिताच्या नसलेल्या गोष्टींमध्ये मात्र जास्त रस घ्यायचा, असे अधिकाऱ्यांचे धोरण आहे. हे उलटे धोरण बदला; अन्यथा अशा कामचुकार अधिकाऱ्यांवर फौजदारी खटले भरले जातील, असा इशारा जलसंधारणमंत्री तानाजी सावंत यांनी आज अधिकाऱ्यांना दिला.

पुणे - राज्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी राज्य सरकार चांगले निर्णय घेत असते. मात्र, अधिकाऱ्यांकडून त्या निर्णयांची तंतोतंत आणि प्रभावी अंमलबजावणी होत नाही. जे समाजाच्या हिताचे आहे, त्याकडे दुर्लक्ष करायचे आणि हिताच्या नसलेल्या गोष्टींमध्ये मात्र जास्त रस घ्यायचा, असे अधिकाऱ्यांचे धोरण आहे. हे उलटे धोरण बदला; अन्यथा अशा कामचुकार अधिकाऱ्यांवर फौजदारी खटले भरले जातील, असा इशारा जलसंधारणमंत्री तानाजी सावंत यांनी आज अधिकाऱ्यांना दिला.

आदर्श गाव संकल्प व प्रकल्प समितीच्या वतीने दिले जाणारे 2017-18 या वर्षाचे आदर्श गाव, उत्कृष्ट संस्था आणि उत्कृष्ट ग्राम कार्यकर्ता पुरस्कार आज पुण्यात सावंत यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले, त्या वेळी ते बोलत होते. या समारंभात पुणे जिल्ह्यातील भागडी (ता. आंबेगाव) या गावाला राज्यस्तरीय द्वितीय पुरस्काराने गौरविण्यात आले. या वेळी आदर्श गाव संकल्प व प्रकल्प समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार, जलसंधारण सचिव एकनाथ डवले, कृषी आयुक्त सुहास दिवसे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उदय जाधव, जिल्हा नियोजन समिती सदस्य दिलीप मेदगे, कृषी उपसंचालक महादेव निंबाळकर, डॉ. कैलास मोते आणि सहसंचालक दादाराम सप्रे आदी उपस्थित होते.

सावंत म्हणाले, 'राज्यात 100 टक्के पाऊस पडणार, 150 टक्के पाऊस पडणार, अशी आकडेवारी अधिकारी कागदावर रंगवून मंत्र्यांना चक्क खोटी माहिती देतात. प्रत्यक्षात 30 टक्के किंवा 40 टक्के पाऊस पडतो. त्यातच बॅंकांकडून शेतकऱ्यांना पुरेसे आणि वेळेवर पीककर्जही मिळत नाही. यामुळे शेतकरी आत्महत्या करीत आहेत. इंग्रज जाऊन 70 वर्षे झाली, तरीसुद्धा आजही त्यांचीच नियमांची चौकट अमलात आणली जाते. ही चौकट मोडली पाहिजे. लोकांचे हित जोपासणारे निर्णय आणि त्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी झाली पाहिजे. शेतकऱ्यांना सरकारकडून केवळ शेतीसाठी पुरेसे पाणी, वीज आणि शेतीमालाला किफायतशीर बाजारभाव या तीन गोष्टींची अपेक्षा आहे. त्यांची किरकोळ अपेक्षाही सरकारला पूर्ण करता आलेली नाही.''

'माझी अवस्था निळू फुल्यांसारखी'
राज्य सरकारने नेहमी जनतेचा हुंकार ऐकला पाहिजे. पण, प्रत्यक्षात तसे घडताना दिसत नसल्याचा माझा गेल्या तीन महिन्यांचा अनुभव आहे. कारण, मी तीन महिन्यांपूर्वीच मंत्री झालो आहे. सध्या सरकारमध्ये माझी अवस्था "सिंहासन' चित्रपटातील निळू फुले यांच्यासारखी झाली असल्याचे स्पष्ट करीत जलसंधारणमंत्री तानाजी सावंत यांनी राज्य सरकारला घरचा आहेर दिला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Criminal offenses against deportation officers Tanaji Sawant