गुन्हेगारांच्या हाती स्टेअरिंग?

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 23 ऑगस्ट 2019

शाळा सोडल्याचे आढळले कोरे दाखले
याप्रकरणी अटक केलेल्या आरोपींकडे शाळा सोडल्याचे कोरे दाखले, मुख्याध्यापकांच्या सहीचे कोरे दाखले यासह तहसीलदारांचे रहिवासी प्रमाणपत्रही आढळले आहे. त्यामुळे परमिटसाठी बनावट प्रमाणपत्र तयार केल्याप्रमाणे वाहन परवान्यासह इतर कामकाजासाठी अशाप्रकारे बनावट कागदपत्रांचा वापर केला जात असल्याचे समोर येत आहे.

पिंपरी - वाहन परमिटसाठी पोलिसांचे बनावट चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र बनविणाऱ्या टोळीला पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून बनावट सही आणि शिक्‍क्‍यांची तसेच मजकुराची एकूण ८८ प्रकरणे जप्त केली आहेत. हे एक प्रकरण उघडकीस आले असले, तरी अशाप्रकारे यापूर्वीही बनावट प्रमाणपत्राद्वारे परमिट मिळविणाऱ्यांचा मोठा आकडा असल्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे. नियमाप्रमाणे चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र न घेता परमिट मिळविण्यासाठी धडपड करणाऱ्या वाहनचालकांमध्ये गुन्हेगारी पार्श्‍वभूमीच्या चालकांचा समावेश असल्याची अधिक शक्‍यता आहे. यामुळे गुन्हेगार प्रवृत्तीच्या चालकाच्या हातात वाहनाचे स्टेअरिंग असून, बेकायदेशीर पद्धतीने परमिट मिळविलेल्या वाहनचालकाचा शोध घेण्याचे आव्हान उपप्रादेशिक परिवहन कार्यालयासह पोलिसांपुढे आहे.

काही दिवसांपूर्वी पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयातील चारित्र्य पडताळणी विभागाचे पोलिस निरीक्षक सुनील पिंजण यांना रिक्षा परमिटसाठी लागणारे पोलिसांचे बनावट चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र मिळाले. दरम्यान, मोशीतील आरटीओ कार्यालयात काही जण एजंट म्हणून काम करणारे ते बनावट प्रमाणपत्र देत असल्याचीही माहिती मिळाली. या टोळीने पिंजण यांची बनावट सही व आयुक्तालयाचा बनावट शिक्का तयार केला. त्याद्वारे ते बनावट कागदपत्रे तयार करून रिक्षा परमिटसाठी त्याचा वापर करीत होते.

गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने या एजंटांची माहिती काढली. सखोल तपास केला असता सात जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून बनावट सही व शिक्‍क्‍यांची वेगवेगळ्या मजकुराची ८८ प्रकरणे जप्त केल्यानंतर सर्व प्रकार उघडकीस आला. दरम्यान, या प्रकारे यापूर्वीही अशाच प्रकारे बनावट कागदपत्रे तयार करून अनेक चालकांना बेकायदारीत्या परमिट मिळवून दिल्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे यापूर्वी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने दिलेल्या परमिटसाठी सादर केलेल्या कागदपत्रांची तपासणी करून बनावट कागदपत्रांचा शोध घेणे गरजेचे आहे.

असा आला प्रकार उघडकीस
पोलिस निरीक्षक सुनील पिंजण यांना एका परमिटसाठी त्यांची सही व आयुक्तालयाच्या शिक्‍क्‍याचा वापर करून तयार केलेले चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र बंद पाकिटातून प्राप्त झाले. या प्रमाणपत्रावरील सही व शिक्का हुबेहूब असला, तरी त्यावरील आवक-जावक क्रमांक व इतर कोडवरून हे प्रमाणपत्र बनावट असल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान, त्या प्रमाणपत्रावरील नावावरून रेकॉर्ड तपासले असता हे प्रमाणपत्र आयुक्तालयाकडून दिले असल्याची कसलीही नोंद पोलिसदफ्तरी नव्हती. त्यानंतर सखोल तपास केला असता हे प्रमाणपत्र मोशीतील आरटीओ कार्यालयात एजंट म्हणून काम करणाऱ्या टोळक्‍याने बनविले असल्याचे समोर आले. त्यानुसार पोलिसांनी या परिसरात सापळा रचून एजंटांची थांबण्याची ठिकाणे, कार्यालयात येण्या-जाण्याची वेळ, परवान्याची कागदपत्रे, कामकाजाची वेळ आदींची माहिती मिळवून सात जणांना ताब्यात घेतले.

टोळीत अधिकाऱ्यांचा सहभाग?
उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या आवारात एजंटांचा मोठ्या प्रमाणात वावर असतो. एखादी व्यक्ती काम करण्यासाठी आल्यास त्याला बाहेरच अडविले जाते. कोणत्या कामासाठी किती पैसे लागतील, याची माहिती देत एखादे प्रमाणपत्र नसल्यास आम्ही करून घेतो, अशी ग्वाहीदेखील एजंटाकडून समोरच्या व्यक्तीला दिली जाते. एजंटांच्या या टोळक्‍यामध्ये कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचाही सहभाग असण्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे.

परमिट मिळविण्यासाठी अर्ज केलेल्या व्यक्तीची गुन्हेगारी पार्श्‍वभूमी आहे की नाही, हे तपासण्यासाठी पोलिसांचे चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र आवश्‍यक असते. हे प्रमाणपत्र वितरित करण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयात स्वतंत्र विभाग स्थापन केला आहे. या प्रमाणपत्रासाठी रोज अर्ज दाखल होत असतात. मात्र, तरीही काही जण रीतसर पद्धतीने अर्ज न करता बनावट प्रमाणपत्राद्वारे परमिट मिळवितात. त्यामुळे चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्रासाठी अर्ज न करता चुकीच्या पद्धतीने प्रमाणपत्र मिळवून परमिट घेणारे वाहनचालक गुन्हेगारी पार्श्‍वभूमीचे असल्याचे स्पष्ट होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Criminal Rickshaw Driver Vehicle Permit Police Crime