Pune : दौंड पोलिसांच्या पक्षपाती भूमिकेवर टीका; राष्ट्रवादी कॅंाग्रेस पक्षाचा पोलिस ठाण्यावर मोर्चा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

pune

Pune : दौंड पोलिसांच्या पक्षपाती भूमिकेवर टीका; राष्ट्रवादी कॅंाग्रेस पक्षाचा पोलिस ठाण्यावर मोर्चा

दौंड : दौंड शहरात सहा महिन्यांपूर्वी जीवे मारण्याचा प्रयत्न करणे व विनयभंग केल्याप्रकरणी शिवसेना (शिंदे गट) शहरप्रमुखासह एकूण २० जणांविरूध्द गुन्हा झाल्यानंतरही दौंड पोलिसांनी संशयितांना अटक न केल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी कॅंाग्रेस पक्षाच्या पुढाकाराने मूक मोर्चा काढण्यात आला. मोर्चेकर्यांनी दौंड पोलिसांच्या पक्षपाती भूमिकेवर जोरदार टीका केली.

दौंड नगरपालिकेतील राष्ट्रवादी कॅंाग्रेस पक्षाचा माजी गटनेता बादशहा शेख हा जीवे मारण्याचा प्रयत्न आणि एका बलात्कार प्रकरणातील संशयित आरोपी आहे. सध्या तो न्यायालयाने मंजूर केलेल्या सशर्त जामीनावर बाहेर आहे. बादशहा शेख याच्या कुटुंबीयांना २० ऑक्टोबर २०२२ रोजी जीवे मारण्याचा प्रयत्न झाला होता.

दौंड पोलिसांनी फिर्याद न घेतल्याने न्यायालयाच्या आदेशाने सहा महिन्यानंतर ११ मे रोजी एकूण २० जणांविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे. सदर गुन्ह्यात जीवे मारण्याचा प्रयत्न करणे व विनयभंग केल्याप्रकरणी शिवसेना शहरप्रमुख श्रीनाथ ननवरे याच्यासह एकूण २० जणांविरूध्द गुन्हा दाखल झाला. परंतु नेहमीप्रमाणे दौंड पोलिसांनी संशयितांना अटक न केल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी पक्षाच्या पुढाकाराने भारतरत्न डॅा. बाबासाहेब आंबेडकर चौकातून मूक मोर्चा काढून तो दौंड पोलिस ठाण्यासमोर विसर्जित करण्यात आला.

राष्ट्रवादीचे नेते तथा माजी आमदार रमेश थोरात यांच्यासह वैशाली नागवडे, वीरधवल जगदाळे, अप्पासाहेब पवार, गुरूमुख नारंग, नितीन दोरगे, सोहेल खान, उध्दव फुले, संभाजी ताकवणे, दीपक सोनवणे, एमआयएम पक्षाचे जिल्हाध्यक्ष फय्याज शेख, बहुजन मुक्ती पार्टीचे राष्ट्रीय महासचिव अॅड. राहुल मखरे, सुरेश वाघमारे, आदी उपस्थित होते.

रमेश थोरात यांनी राज्य शासनाच्या कार्यपध्दतीवर टीका करीत दौंड पोलिसांनी अन्याय न करता तातडीने आरोपींना अटक करण्याची मागणी केली. तसेच जाणीवपूर्वक गुन्हे दाखल करण्याचे न थांबल्यास आणि आरोपींना अटक न केल्यास पोलिस ठाण्यावर दहा पट मोठा मोर्चा काढण्याचा इशारा श्री. थोरात यांनी दिला.