आमच्यावर टीका म्हणजे सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न : ढोरे

रमेश मोरे
बुधवार, 29 ऑगस्ट 2018

जुनी सांगवी : शहरातील स्मशानभूमीमध्ये पर्यावरणपूरक गॅस शवदाहिनी बसविण्याच्या कामात कोट्यवधी रुपये लाटण्याचा सांगवीतील माजी नगरसदस्याचा डाव महापालिका निवडणुकीच्या आधी भाजपनेच उधळून लावला होता. त्याआधीच सांगवीतील स्मशानभूमीत गॅस शवदाहिनी बसविण्याच्या कामात कोट्यवधींची मलई कोणी खाल्ली, हे शहरातील जनतेला वेगळे सांगण्याची गरज नाही. यांना ही मलई इतकी महागात पडली की महापालिका निवडणुकीत सांगवीतील मतदारांनी कायमचे घरी बसविले.

जुनी सांगवी : शहरातील स्मशानभूमीमध्ये पर्यावरणपूरक गॅस शवदाहिनी बसविण्याच्या कामात कोट्यवधी रुपये लाटण्याचा सांगवीतील माजी नगरसदस्याचा डाव महापालिका निवडणुकीच्या आधी भाजपनेच उधळून लावला होता. त्याआधीच सांगवीतील स्मशानभूमीत गॅस शवदाहिनी बसविण्याच्या कामात कोट्यवधींची मलई कोणी खाल्ली, हे शहरातील जनतेला वेगळे सांगण्याची गरज नाही. यांना ही मलई इतकी महागात पडली की महापालिका निवडणुकीत सांगवीतील मतदारांनी कायमचे घरी बसविले. सांगवीतील स्मशानभूमीच्या रखडलेल्या कामांवरून भाजपला टार्गेट करणे म्हणजे सांगवीतील नागरिकांची सहानुभुती मिळविण्याचा प्रयत्न असल्याचा घणाघात भाजपचे नगरसेवक हर्षल ढोरे यांनी राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे यांच्यावर केला आहे.

सांगवीतील रखडलेल्या स्मशानभूमीच्या कामांवरून प्रशांत शितोळे यांनी भाजपवर केलेल्या टिकेला भाजप नगरसेवक हर्षल ढोरे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. हर्षल ढोरे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की “सांगवीत मुळा नदीच्या काठावर स्मशानभूमीचे काम सुरू आहे. या कामाला मागील पंचवार्षिकमध्येच म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असताना मंजुरी देण्यात आली. यांच्याच ठेकेदाराला हे काम देण्यात आले आहे. या कामाला मंजुरी देण्यासाठी त्यावेळी हेच होते. या कामात झालेला भ्रष्टाचार सर्वश्रुत आहे.

सांगवी भागातील जनतेने २०१७ च्या महापालिका निवडणुकीत यांना कायमचे घरी बसवले. पराभवानंतर यांनी स्मशानभूमीच्या कामात अनेक विघ्ने आणण्यास सुरवात केली. स्मशानभूमीच्या जागेचा वाद उकरून काढत, मोबदला मिळावा म्हणून कामाला आडकाठी आणली.स्मशानभूमीच्या जागेचाही मोबदला मागण्याची खालची पातळी यांनी गाठली. या जागेच्या सात बारा उताऱ्यावर अनेक नागरिकांची नावे आहेत.  

मोबदला मिळावा म्हणून कामाचा ठेकेदार यांनीच पोसलेला असल्यामुळे त्यानेही प्रशासनाकडे काम पूर्ण व्हावे. यासाठी कायदेशीर मार्गाचा अवलंब करण्यासाठी पाठपुरावा केला नाही. या कामाची मुदत संपून गेली आहे. त्यामुळे या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे करण्यात आली आहे. स्मशानभूमीची जागा नदीपात्रातील असल्यामुळे त्याचा मोबदला देता येत नसल्याचे आयुक्त हर्डीकर यांनी स्पष्ट केलेले आहे. तरीही यांनी स्मशानभूमीच्या कामाची अडवणूक करून काम बंद पाडले आहे. आता हिच मंडळी भाजप नगरसेवकांच्या नावाने अपप्रचार करत आहे. सांगवीतील नागरिकांची सहानुभूती मिळविण्याचा केविलवाणा प्रयत्न करत असल्याचे नगरसेवक हर्षल ढोरे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

Web Title: Criticizing us Creating sympathy