पीक कर्ज परतफेडीला पुन्हा तीन महिन्यांची मुदतवाढ, मात्र...

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 26 May 2020

पीक कर्जासाठी शून्य टक्के व्याजदराचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना आणखी तीन महिन्यांची मुदतवाढ मिळाली आहे.

पुणे : पीक कर्जासाठी शून्य टक्के व्याजदराचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना आणखी तीन महिन्यांची मुदतवाढ मिळाली आहे. मात्र, या बाबत आदेश येणे बाकी आहे. मात्र ही मुदतवाढ मिळाली असली, तरी यंदा पुन्हा नवे कर्ज हवे असल्यास, मागील वर्षीच्या पीक कर्जाची परतफेड करणे आवश्यक आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप                  

राज्य सरकारने जाहीर केलेल्या महात्मा फुले कर्जमाफी योजनेतील पात्र शेतकऱी केवळ तांत्रिकदृष्ट्या थकबाकीदार दिसत आहेत. त्यामुळे या कर्जमाफीच्या यादीतील  शेतकऱ्यांना यंदा पुन्हा पीक कर्जाचा लाभ दिला जाणार आहे.  

आणखी वाचा - राहुल गांधींच्या वक्तव्याने महाराष्ट्रात खळबळ

कोरोना विषाणू संसर्गामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे या शेतकऱ्यांना कर्जमाफीबाबतच्या काही तांत्रिक बाबी पुर्ण करता आलेल्या नाहीत. त्यामुळे केवळ तांत्रिकदृष्ट्या ते थकबाकीदार दिसत आहेत. या शेतकऱ्यांना पीक कर्जाचा लाभ देताना त्यांच्याकडील तांत्रिक थकबाकीपुढे सरकारकडून येणे बाकी असा उल्लेख केला जाणार आहे. तसा आदेश राज्य सरकारने दिला असल्याचे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे (पीडीसीसी) अध्यक्ष रमेश थोरात यांनी सांगितले.

आणखी वाचा - मुंबई, पुण्याबाबतचा तो मेसेज खोटा; वाचाा बातमी

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्यावतीने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तीन लाख रुपयांपर्यंतचे पीक कर्ज शून्य टक्के व्याजाने दिले जाते. मात्र, या योजनेचा लाभ घेण्यासाठी दरवर्षी ३१ मार्चपर्यंत या कर्जाची परतफेड करणे अनिवार्य आहे. परंतु, यंदा देशात उद्भवलेल्या कोरोना विषाणू संसर्गामुळे भारतीय रिझर्व्ह बँकेने यासाठी ३० जूनपर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे येत्या ३१ मेपर्यंत परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाच या शून्य टक्के व्याजाची सवलत मिळणार आहे. 

आणखी वाचा - पुण्यातल्या त्या 400 पॉझिटिव्ह रुग्णांबाबत मोठा खुलासा

परंतु, अद्यापही कोरोना विषाणू संसर्ग कमी न झाल्याने रिझर्व्ह बँकेने पीककर्ज परतफेडीसाठी पुन्हा एकदा तीन महिन्यांची मुदतवाढ जाहीर केली आहे. त्यामुळे या पीक कर्जाच्या परतफेडीसाठी शेतकऱ्यांना ऑगस्ट अखेरपर्यंत मुदतवाढ मिळणार आहे. या बाबत आदेश येणे बाकी आहे. जिल्हा बँकेच्या वतीने दरवर्षी १ एप्रिल ते ३० सप्टेंबर या कालावधीत खरीप हंगामातील पिकांसाठी कर्ज देण्यात येते. यासाठी तीन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना असलेली व्याज आकारले जात नाही. 

पुन्हा कर्जासाठी परतफेड अनिवार्य

पीक कर्जाच्या परतफेडीसाठी रिझर्व्ह बँकेने दिलेल्या मुदतवाढीचा फायदा हा केवळ शून्य टक्के व्याजाच्या सवलतीपुरताच मर्यादित आहे. ज्या शेतकऱ्यांना केवळ व्याज सवलतीचाच  लाभ घ्यायचा आहे, ते शेतकरी मुदतवाढ संपेपर्यंत कर्जाची परतफेड करू शकतात. मात्र, ज्यांना यंदा पुन्हा पीक कर्ज हवे आहे. त्यांना मात्र आधीच्या कर्जाची अगोदर परतफेड करावी लागणार असल्याचे जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रतापसिंह चव्हाण यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Crop loan repayment will be extended again pune marathi news