अर्ज भरण्यासाठी इच्छुकांची गर्दी 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 3 फेब्रुवारी 2017

पिंपरी - महापालिका निवडणुकीचे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी एकच दिवस उरला आहे. त्यामुळे गुरुवारी शहरातील 11 निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात इच्छुकांनी अर्ज भरण्यासाठी चांगलीच गर्दी केली होती. राजकीय पक्षांच्या उमेदवारी याद्यांचा घोळ कायम असताना पक्षाचा एबी फॉर्म मिळण्याची खात्री बाळगून काही इच्छुकांनी थेट पक्षाच्या नावानेच अर्ज भरले. 

पिंपरी - महापालिका निवडणुकीचे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी एकच दिवस उरला आहे. त्यामुळे गुरुवारी शहरातील 11 निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात इच्छुकांनी अर्ज भरण्यासाठी चांगलीच गर्दी केली होती. राजकीय पक्षांच्या उमेदवारी याद्यांचा घोळ कायम असताना पक्षाचा एबी फॉर्म मिळण्याची खात्री बाळगून काही इच्छुकांनी थेट पक्षाच्या नावानेच अर्ज भरले. 

यंदा प्रथमच ऑनलाइन अर्ज भरून त्याची प्रिंट काढून निवडणूक कार्यालयात शपथपत्रासह जमा करायची आहे. त्यामुळे ऑनलाइन अर्जाची प्रक्रिया पूर्ण करून अर्ज भरण्यासाठी सकाळी अकरापासूनच उमेदवार व त्यांचे समर्थक निवडणूक कार्यालयाजवळ जमण्यास सुरवात झाली होती. निवडणूक निर्णय कार्यालयापर्यंत इच्छुक व त्यांचे समर्थक काही ठिकाणी वाहनांद्वारे, तर काही ठिकाणी चालत आले होते. सकाळी अर्ज भरणाऱ्या इच्छुकांचे प्रमाण कमी होते. दुपारनंतर मात्र त्यात वाढ झाली. 
विविध राजकीय पक्षांकडून संभाव्य बंडखोरीच्या भीतीने उमेदवार याद्या जाहीर करण्यास विलंब होत आहे. शुक्रवारी (ता. 3) अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी अधिकृत उमेदवारांच्या थेट हातातच एबी फॉर्म देण्याचे नियोजन आहे. त्यामुळे ज्या इच्छुकांना पक्षश्रेष्ठी व स्थानिक पातळीवरील नेत्यांनी पक्षाकडून उमेदवारी अर्ज भरण्यास सांगितले आहे, त्यांनी पक्षाच्या नावाने उमेदवारी अर्ज भरले, तर ज्यांना पक्षाच्या उमेदवारीबाबत साशंकता आहे, त्यांनी राजकीय पक्ष आणि अपक्ष असे अर्ज भरले. 

उमेदवारांच्या मदतीसाठी निवडणूक कार्यालयांमध्ये मदतकक्ष उभारण्यात आला आहे. तेथे त्यांना कागदपत्र व अन्य शंकांबाबत मार्गदर्शन केले जाते. त्याशिवाय उमेदवारांना विविध प्रकारच्या परवानग्या एकाच ठिकाणी मिळाव्यात, यासाठी एक खिडकी योजना कार्यान्वित केली आहे. प्रत्येक कार्यालयनिहाय आचारसंहिता भंगाबाबत तक्रारी करण्यासाठी आवश्‍यक व्यवस्था केली आहे. त्याशिवाय निवडणूक कार्यालयाच्या बाहेर दर्शनी भागात उमेदवारी अर्ज भरण्याबाबत आवश्‍यक सूचना लावल्या आहेत. तसेच ज्या उमेदवारांनी अर्ज भरलेले आहेत, त्यांची सविस्तर माहिती येथील नोटीस बोर्डवर लावली आहे. 

Web Title: The crowd of aspirants to fill the application form