ऐतिहासिक मांजराईदेवी मंदीरात नवरात्रोत्सवानिमित्त भाविकांची गर्दी

manjari
manjari

मांजरी - आपलं गाव, आपली माणसे, आपलं शिवार याविषयी प्रत्येक माणसाला ओढ असते. तशीच ओढ आपल्या गावच्या ग्रामदैवता विषयी सर्वांनाच असते. त्यातच त्याला काही पौराणीक ऐतिहासिक पार्श्र्वभूमी लाभलेली असेल तर ही भावना अधिकच दृढ होत जाते. मांजरी बुद्रुक गावातील आणि येथील मुळा-मुठा नदीतीरी वास्तव्यास असलेल्या मांजराई देवी बाबत अशीच श्रध्दा, भक्ती आणि जिव्हाळ्याचे नाते परिसरातील प्रत्येक माणसाने जपलेले आहे. 

या देविची स्थापना व मंदिराच्या निर्मितीबाबत एक आख्यायिका आहे. पांडव अज्ञात वासात असताना प्रवासा दरम्यान एका रात्री ते या ठिकाणी मुक्कामी राहिले होते. या मुक्कामात आई माद्री हिची आठवन म्हणून त्यांनी मुक्कामाच्या ठिकाणी मुळा-मुठा नदीतिरी एका रात्रीत मंदीर उभारले. संपूर्ण काळ्या पाषाणामध्ये या मंदिराचे चांगले काम केलेले आहे. मंदिराचे काम करीत असताना सुर्योदय झाल्याने पुढचे काम त्यांनी थांबविले. त्यामुळे कळसाचे काम अपूर्ण सोडून पांडवांनी येथून प्रस्थान केले. "माद्री"च्या नावाने उभारलेल्या या मंदिरामुळे पुढे येथील वस्तीला माद्री हे नाव पडले. पुढे-पुढे त्याचा अपभ्रंश होऊन या गावाला "मांजरी' हे नाव पडले व तेच नाव पुढे रूढ झाले.  

मंदिरातील माद्रीचिही पुढे मांजराई देवी झाली. तिच्या दर्शनाने भक्ताची आत्मशक्ती वाढून जीवनात स्थैर्य आणि धैर्य येते. अशी भावना ग्रामस्थांसह आसपासच्या गावातील नागरिकांचीही आहे. भक्तांना शक्ती देणारी किंवा संकल्प तडीस  नेण्यासाठी ताकद देणारी महाशक्ती म्हणूनही मांजराई देविकडे पाहिले जाते. ग्रामस्थांचे श्रध्दास्थान असलेल्या या देविच्या मंदिरात नवरात्र उत्सव दरवर्षी मोठ्या भावपूर्ण वातावरणात साजरा केला जातो. 
जागृत ग्रामदैवत म्हणून ग्रामस्थांकडून देविची नियमीत पूजा अर्चा होत असते. मुळा-मुठा नदिच्या तिरावर वसलेल्या गावाला याच देविच्या नावावरून मांजरी हे नाव पडले.  मांजराई देविची स्थापना पांडवांनी केल्यामुळे त्या काळापासूनचा इतिहास या गावाला असल्याचे सांगितले जाते. 

दर वर्षी नवरात्रोत्सवात सकाळ-संध्याकाळी महाआरती, जागरण, गोंधळ अशा विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन येथे केले जाते. काम-धंद्या निमित्त बाहेरगावी असलेले या गावातील लोक नवरात्रात अवर्जून देविच्या दर्शनासाठी गावात येत असतात. तीन वर्षापूर्वी या मंदिराचा जिर्णोध्दार करण्यात आला आहे. मंदिराच्या परिसराचे काँक्रिटीकरण करण्यात आले असून बागबगिचाही फुलविण्यात आला आहे. नवरात्रोत्सवात नऊ दिवस वेगवेगळ्या प्रकारे देविची पूजा बांधली जाते. या काळात परिसरात मंडप व कमानी उभारण्यात येऊन त्यावर विद्युत रोषणाई करण्यात येते. दररोज वेगवेगळ्या फुलांची सजावटही केली जाते. त्यामुळे संपूर्ण परिसरात उत्साह व चैतन्याचे वातावरण असते. दसऱ्याच्या दिवशी सिमोलंघनाचा सोहळाही येथे थाटात साजरा केला जातो. 

दरवर्षी चंपाषष्टीला गावाकडून देविचा उत्सव भरविला जातो. गोडधोडाचा नैवद्या घराघरातून देविसाठी पाठविला जातो. पै-पाहुण्यांनाही जेवनासाठी निमंत्रीत केले जाते. संकल्प पूर्ती करणारी देवी म्हणून तालुक्यातील विविध गावातूनही मोठ्या प्रमाणातील नागरीक येथे दर्शनासाठी येत असतात. ग्रामपंचायत, उत्सव समिती व ग्रामस्थांकडून या काळात होम हवन, पूजा आरती आदी विधी मोठ्या आनंदात पार पाडले जातात. वर्षभर देविच्या पुजेसाठी पूजाऱ्याचीही नेमणूक करण्यात आली आहे.

गावात येणाऱ्या नववधू किंवा माहेरवाशीन अवर्जून देविच्या दर्शनाचा अग्रह करीत असतात. अनेक पिढ्या आल्या-गेल्या मात्र देविच्या आगत-स्वागताची परंपरा आजही ग्रामस्थांनी टिकहून ठेवली आहे. त्यामुळे माणसातील माणूसपण टिकवून धरण्यातही मोठी मदत होत आहे.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com