भाजे येथे पर्यटकांची गर्दी

भाजे येथे पर्यटकांची गर्दी

कामशेत - भाजे येथील धबधब्याखाली चिंब भिजण्याचा आणि पावसाळी पर्यटनाचा हजारो पर्यटकांनी रविवारी (ता. २२) आनंद लुटला.  विसापूर व लोहगड किल्ल्याच्या कुशीत असलेले भाजे गाव बौद्धकालीन लेण्यासाठी प्रसिद्ध आहे; तसेच पावसाळ्यातील वर्षाविहारासाठी देखील पर्यटक मोठ्या संख्येने येतात. रविवारी दिवसभर पावसाची उघडझाप आणि येणाऱ्या जोरदार सरींमुळे अत्यंत अनुकूल असे वातावरण होते. सुमारे शंभर मीटर उंचीवरून पडणारे धबधब्याचे पाणी व या धबधब्याखाली भिजण्याचा आनंद असंख्य पर्यटकांनी मनमुराद घेतला. यामध्ये तरुण- तरुणींची संख्या लक्षणीय होती. त्याबरोबरच अनेकांनी सहकुटुंब वर्षा सहलीचा आनंद घेतला. 

सकाळपासूनच या ठिकाणी मोठी गर्दी पाहावयास मिळाली. पर्यटक आपापल्या दुचाकी; तसेच चारचाकी गाड्यातून आले होते. काहीजण लोकलने येऊन मळवली स्टेशनहून पायी आले होते. मुख्य धबधब्याच्या पलीकडे असलेला छोटा धबधबादेखील पर्यटकांनी फुलून गेला होता. मुख्य धबधब्याखाली तर मोठ्या संख्येने तरुण मंडळी भिजण्याचा आनंद घेत होती. लोणावळा हे पर्यटकांचे आवडते ठिकाण आहे; परंतु खूप गर्दीमुळे अनेक नागरिक नाणे मावळ, आंदर मावळ, पवन मावळ या भागात जाणे पसंत करतात; तर कार्ला लेणी, भाजे लेणी हे लोणावळ्यापासून जवळ असल्याने अनेकजण पर्याय म्हणून भाजे धबधबा व लेणी पाहण्यासाठी येतात.

या ठिकाणी येणाऱ्या गाड्यांसाठी पार्किंगची मोठी समस्या आहे. ती सोडविणे गरजेचे आहे. खासगी पार्किंग आहे पण ते अपुरे आहे. कार्ला ते मळवली दरम्यान मोठी वाहतूक कोंडी होते. रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडल्यामुळे पर्यटकांचा खूप वेळ त्यात वाया जात होता. चिंतेची बाब म्हणजे अनेक तरुण बिअर व मद्याच्या बाटल्या घेऊन येत होते. व्यसनाधीन व धांगडधिंगा करणाऱ्यांमुळे इतरांना त्याचा त्रास सहन करावा लागला. 

मद्याच्या बाटल्या असलेली एक गाडी महिला मंडळातील महिलांनी पकडली, पण पोलिसांना चकवा देऊन कधी गेली हेदेखील कळले नाही.  भाजे ग्रामपंचायतीने गेल्या वर्षीपासून बाहेरून येणाऱ्या पर्यटकांसाठी प्रतिगाडी पाच रुपये स्वच्छताकर आकारण्यास सुरवात केली आहे. तुळजाभवानी महिला मंडळातर्फे हे काम केले जाते. त्यामुळे परिसर स्वच्छ ठेवण्यास मदत होते, असे मंडळाच्या अध्यक्षा संगीता भोरपकर यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com