
Pune : खडकवासला चौपाटीवर गर्दी परंतु पाण्याजवळ 'नो एंट्री'
किरकटवाडी : पोलीस प्रशासनाने पुढाकार घेऊन खडकवासला चौपाटी परिसरात पर्यटक पाण्यात उतरु नयेत म्हणून व मुख्य रस्त्यावर वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून चौपाटीवरील विक्रेत्यांच्या सहकार्याने केलेल्या प्रयत्नांना आज यश आलेले दिसले. रविवारच्या सुट्टीमुळे चौपाटीवर पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती मात्र एकाही पर्यटकाला पाण्यात जाता आले नाही. तसेच मागील आठवड्याच्या तुलनेत वाहतूकीतही सुधारणा दिसत होती.
मागील आठवड्यात सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे हजारो पर्यटक खडकवासला धरण चौपाटीवर आले होते व खडकवासला धरणाच्या पाण्यात उतरले होते. तसेच पर्यटकांनी रस्त्याच्या दोन्ही बाजूंना अस्ताव्यस्त वाहने उभी केल्याने वाहतुकीत अडथळा निर्माण होऊन मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती.
याबाबत सकाळ'ने प्रशासनाचे लक्ष वेधल्यानंतर हवेली उपविभागीय पोलीस अधिकारी भाऊसाहेब ढोले यांच्या नेतृत्वाखाली सर्व संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांनी चौपाटी परिसरात पाहणी केली व तातडीने उपाययोजना करण्याचे ठरले.
त्यानुसार हवेली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन वांगडे यांनी मागील दोन दिवसांत चौपाटीवरील धरणात उतरण्याच्या वाटा बंद करून विक्रेत्यांच्या बाजूने वाहने उभी राहू नयेत म्हणून बांबूचे कुंपण करुन घेतले. तसेच रस्त्यावर प्लास्टिक चे बॅरिकेड्स लावून दुभाजक करण्यात आले. यामुळे आज चौपाटीवर गर्दी झालेली असताना एकाही पर्यटकाला पाण्यात उतरता आले नाही व वाहतूक कोंडीतही सुधारणा झालेली दिसली.
"खडकवासला धरणाचे पाणी पिण्यासाठी वापरले जाते त्यामुळे प्रशासनाने पाण्यात उतलण्यास बंदी घातली हे चांगले केले आहे. खरंतर कायमस्वरूपी कुंपण असणे आवश्यक आहे. अन्यथा काही दिवसांनंतर परिस्थिती पुन्हा पहिल्यासारखी व्हायला नको."
- श्रीकांत पाठक, पर्यटक.
" पोलीसांनी सांगितल्याप्रमाणे पूर्ण चौपाटीवरील हातगाड्यांच्या समोर आम्ही बांबू रोवून कुंपण केले आहे. कोणालाही रस्त्यावर गाडी उभी करु दिली नाही. आमच्याही उपजिवीकेचा प्रश्न असल्याने आम्ही सर्व विक्रेते नियोजनासाठी प्रशासनाला सहकार्य करत आहोत."
- विनोद देसाई, खाद्यपदार्थ विक्रेता.
"मागील दोन दिवसांत सातत्याने पाठपुरावा करुन ठरल्याप्रमाणे उपाययोजना करुन घेतल्या ज्याचा खूप सकारात्मक परिणाम आज दिसून आला. अजूनही काही उपाययोजना करण्यात येणार आहेत. वाहनांची संख्या मोठी असल्याने व त्या तुलनेत रस्ता अत्यंत अरुंद असल्याने वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी काटेकोर नियोजन करण्यात येणार आहे."
- सचिन वांगडे, पोलीस निरीक्षक, हवेली पोलीस ठाणे, पुणे ग्रामीण.
