पुणे : लग्न समारंभांना होतीये गर्दी; शासनाच्या निर्णयाला केराची टोपली...

मंगळवार, 30 जून 2020

- पूर्व हवेलीमधील मंगल कार्यालयात लग्न समारंभाना तुडूंब गर्दी. - पन्नास जणांच्या उपस्थितीबाबतच्या शासनाच्या आदेशाला केराची टोपली. 

लोणी काळभोर : पूर्व हवेलीमधील दहा मंगल कार्यालयात मागील चार दिवसात पंधराहून अधिक लग्न सोहळे पार पडले असून, काही अपवाद वगळता सर्वच लग्न सोहळ्यांना तुडूंब गर्दी जमत असल्याचे दिसून आले. मंगल कार्यालयात परवानगी देताना लग्न कार्यासाठी शासनाने 50 जणांच्या उपस्थितीची मर्यादा घालून दिली असली तरी, पूर्व हवेलीमधील मंगल कार्यालय मात्र शासनाच्या आदेशाला केराची टोपली दाखवली जात असल्याचे दिसून येत आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पूर्व हवेलीमधील ऍक्टिव्ह कोरोनाबाधित रुग्णांची संख्या मागील सात दिवसांच्या कालावधीत 85 हून अधिक झाली आहे. तर कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांची संख्या पाचशेहून अधिक झाली. पूर्व हवेली कोरोनाचा हॉटस्पॉट बनलेला असताना, मंगल कार्यालयातील वाढती गर्दी चिंतेची बाब ठरु शकते. मात्र, लग्न कार्यालयामधील गर्दीकडे पोलिस यंत्रणा, महसूल खाते व ग्रामपंचायत प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याने, मंगल कार्यालयावर कारवाई तर कोेण करणार असा प्रश्न पूर्व हवेलीमधील नागरिकांना सतावू लागला आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पुणे-सोलापूर महामार्गावर मांजरी बुद्रुक ते उरुळी कांचन या दरम्यान वीसहून अधिक मोठ्या स्वरुपाची मंगल कार्यालये असून, पंधराहून अधिक छोटी मंगल कार्यालये आहेत. पुर्व हवेली हा भाग पुणे शहराशी निगडीत असल्याने, हडपसर, फुरुसुंगी, मांजरी बुद्रुकसह पूर्व हवेलीमधील बहुतांश वर व वधुपिते लग्नांचे बेत पुणे-सोलापुर महामार्गावरील मांजरी बुद्रुक ते उरुळी कांचन या दरम्यानच्या मंगल कार्यालयातच फिक्स करतात. शासनाने जास्तीत जास्त 50 जणांच्या उपस्थितीत मंगल कार्यालयात लग्नाला परवानगी दिलेली असली तरी, पूर्व हवेलीमधील लग्न समारंभात उपस्थितांची संख्या 300 पासून हजारो जणांवर जात आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पूर्व हवेलीमधील मंगल कार्यालयातील लग्न सोहळ्यातील उपस्थिती राजरोसपणे नियमाला पायदळी तुडवुन होत असतानाही, हवेली तहसील विभाग व पोलिस खात्याकडून मागील पाच दिवसात एकही कारवाई झालेली नाही.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

लग्न सोहळ्यात उपस्थित राहणाऱ्या मंडळीकडुन सोशल डिस्टन्स पाळणे, मास्क वापरणे, सॅनिटायझरचा वापर करणे या बाबीला फाटा दिला जात आहे. हवेलीचे उपविभागीय अधिकारी सचिन बारवकर यांनी दोनच दिवसापूर्वी महसुल व पोलिस प्रशासनाला कारवाईचे आदेश दिले असले तरी, कारवाई होणार का याकडे सर्वसामान्य नागरीकांचे लक्ष लागून राहिले आहे.