दावा फोल

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 19 फेब्रुवारी 2019

बारामती - बारामती पोलिस ठाण्यात सीआरपीएफच्या जवानाला मारहाण झाली नाही व अटकही केलेली नाही, हा जिल्हा पोलिस अधीक्षकांचा दावा फोल ठरला. माजी सैनिकांनी सोमवारी अशोक इंगवले यांचा ठाण्यातील लॉकअपमध्ये बसलेला व्हिडिओच सोशल मीडियात पुराव्यादाखल व्हायरल केला.

बारामती - बारामती पोलिस ठाण्यात सीआरपीएफच्या जवानाला मारहाण झाली नाही व अटकही केलेली नाही, हा जिल्हा पोलिस अधीक्षकांचा दावा फोल ठरला. माजी सैनिकांनी सोमवारी अशोक इंगवले यांचा ठाण्यातील लॉकअपमध्ये बसलेला व्हिडिओच सोशल मीडियात पुराव्यादाखल व्हायरल केला.

अशोक इंगवले यास मारहाण झाल्याबद्दल बारामतीसह राज्यभरात पोलिसांविरोधात नाराजी असतानाच रविवारी पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी अशोक इंगवले यास अटकही केली नव्हती व त्यास मारहाणही झाली नव्हती, अशी माहिती प्रसार माध्यमांना दिली होती. हे प्रकरण पोलिसांवर शेकणार व सध्याच्या देशभरातील स्थितीच्या पार्श्वभूमीवर वातावरण तापणार, याची कल्पना आलेल्या पोलिस अधीक्षकांनी निवेदन प्रसिद्धीस देऊन वरील वक्तव्य केले होते. मात्र, तांत्रिकदृष्ट्या अशोक इंगवले यास अटक झालेली नसली तरी प्रत्यक्षात त्यास पोलिस ठाण्यामधील तात्पुरत्या कोठडीत बसवण्यात आले होते, तसा व्हिडिओच माजी सैनिकांनी सोशल मीडियात व्हायरल केला. त्यामुळे पोलिस अधीक्षक संदीप पाटील खोटे बोलत असल्याबद्दल सोनगावच्या नागरिकांनीही आंदोलनादरम्यान नाराजी व्यक्त केली.

सोनगावासह तालुक्‍यात अवैध धंदे सुरू आहेत. मात्र, त्याकडे पोलिस डोळेझाक करतात. पोलिसांच्या चुकीच्या कार्यपद्धतीकडे कोणी बोट दाखवले तर मात्र उलट त्यालाच आडवे करतात. पोलिसांच्या या विचित्र पद्धतीमुळे पोलिस ठाण्यात जाण्याचीही भीती वाटू लागल्याचे आंदोलक सांगत होते.

स्वतःच कोठडीत जाऊन बसले...
पोलिस ठाण्याचे निरीक्षक गोडसे यांनी माजी सैनिकांनी अशोक इंगवले यांना अटक केली नाही, ते स्वतःच जाऊन लॉकअपमध्ये बसले व नागरिकही लॉकअपमध्ये ये-जा करीत होते, असे सांगितले होते. त्यावरही नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.

Web Title: CRPF Jawan Ashok Ingawale Police Station Proof