सीएसआर प्रस्तावांकडे महापालिकेचे दुर्लक्ष

महेंद्र बडदे
सोमवार, 16 जुलै 2018

पुणे - प्लॅस्टिकच्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी ‘सीएसआर’( उद्योगांचे सामाजिक उत्तरदायित्व) च्या माध्यमातून आलेल्या प्रस्तावाकडे महापालिका प्रशासनाचे तीन वर्षांपासून दुर्लक्ष झाले आहे. प्रशासकीय निर्णयानंतरही या कामाच्या निविदा काढल्याच गेल्या नाहीत. त्याचप्रमाणे प्लॅस्टिकच्या बाटल्या ‘क्रश’ करण्यासाठी उपलब्ध झालेल्या दहांपैकी केवळ दोनच मशिन सुरू आहेत. 

प्लॅस्टिकच्या कचऱ्याची विल्हेवाट लावणे हा महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाला डोकेदुखीचा विषय ठरला आहे. प्लॅस्टिकचा पुनर्वापर करण्यासंदर्भात महापालिकेकडे काही उद्योगसमूह, कंपन्यांनी ‘सीएसआर’च्या माध्यमातून प्रस्ताव दाखल केले होते. त्यानुसार दोन वर्षांपूर्वी प्लॅस्टिकच्या बाटल्या ‘क्रश’ करण्यासाठी एका उद्योजकाने ७० लाख रुपये दिले होते. 

बाटल्या ‘क्रश’ करण्यासाठी मशिन बसविण्याचा निर्णय झाला. दहा मशिन महापालिकेला उपलब्ध झाली, मात्र त्यापैकी कोरेगाव पार्क आणि औंधमध्ये बसविली. रेल्वे स्थानक, एसटी आणि पीएमपी स्थानक, विमानतळ, गर्दीच्या ठिकाणी ही मशिन बसविणार होती. प्लॅस्टिकच्या पिशव्या आणि इतर कचऱ्यापासून बारीक गोळ्या आणि इंधन तयार करण्यासाठी एका उद्योजकाने ‘सीएसआर’च्या माध्यमातून १ कोटी १० लाख रुपये निधी उपलब्ध करून देण्याची तयारी दाखविली होती. यासाठी भैरोबा पंपिंग स्टेशन येथील पाच गुंठे जागा देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता. याकामासाठी निविदा काढण्याचा निर्णय झाला होता. या निर्णयाची अद्याप अंमलबजावणीच झाली नाही. दोन वर्षांहून अधिक काळ या निर्णयाला झाला असल्याने यातून प्रशासनाची उदासीनता दिसून येत आहे.

बाटल्या क्रश करण्यासाठी आणखी काही ठिकाणी मशिन्स बसविण्यात येणार आहेत.  भैरोबा पंपिंग स्टेशन येथे प्रकल्प सुरू करण्यासाठी निविदा काढल्या जातील. 
- सुरेश जगताप, सहआयुक्त, घन कचरा व्यवस्थापन

 अशा प्रस्तावांकडे महापालिका प्रशासनाने सकारात्मक दृष्टीने बघणे गरजेचे आहे. हे प्रकल्प, योजना यशस्वी झाल्या, तर आणखी उद्योजक, कंपन्यांचा ‘सीएसआर’चा निधी नागरी सुविधांसाठी उपलब्ध होऊ शकतो. 
- बाबू वागसकर,  माजी नगरसेवक, नेते मनसे

Web Title: CSR Proposal Ignore by Municipal