बाजारपेठा ओस! 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 10 नोव्हेंबर 2016

"आज, काय गर्दी नव्हती. सकाळपासून फक्त दोनशे रुपयांचा माल गेला. अचानक नोटा बंद केल्यामुळे आमची किती तारांबळ उडाली.. सुटे पैसे कुठून आणायचे.. आता काय करावं?' असा सवाल दुकानदार दीपक घाडगे विचारत होते. पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा बंद केल्याचा फटका त्यांच्या व्यवसायाला बसला आहे. हॉटेल्स असो वा पंक्‍चरचे दुकान नोटा बंद झाल्याने बंदीमुळे बुधवारी ग्राहक दुकानांकडे फिरकले नाहीत. त्यात ग्राहकांबरोबरच दुकानदारांकडेही सुट्या पैशांचा तुटवडा असल्याने सकाळपासून दुकाने ग्राहकांविना ओस पडली होती. बेकरी, किराणा माल, इलेक्‍ट्रॉनिक साहित्याची दुकानांमध्ये ग्राहकांची गर्दी दिसली नाही. 

नोटा चलनातून बंद झाल्याचा फटका किरकोळ विक्रेते आणि दुकानदारांच्या व्यवसायाला बसला आहे. किराणा मालाचे दुकान असो वा हॉटेल्स...सगळीकडे सुट्या पैशांचा तुटवडा असल्यामुळे ग्राहकांविना दुकाने ओसाड पडली आहेत. पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा स्वीकारण्यास दुकानदार व विक्रेते नकार देत असून, त्याचा परिणाम दुकानदारांना सहन करावा लागत आहे. ग्राहकांविना संपूर्ण दुकाने ओस पडली होतीच; पण त्यामुळे शहरही ओस पडले होते. 

दुकानांमध्ये पाचशे व एक हजार रुपयाची नोट स्वीकारण्यास दुकानदारांनी सक्त मनाई केल्याने दुकानांमध्ये ग्राहकांची गर्दी झाली नाही. विशेष म्हणजे रस्त्यावर पथारीवाले नव्हते. किराणा मालाच्या दुकानांवरही ग्राहकांची गर्दी नव्हती, तर मोबाइल रिचार्ज करण्यासाठी आलेल्या लोकांनाही पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटांमुळे मागे फिरकावे लागले. सुटे पैसे नसल्यामुळे महिला-युवतींना खरेदी करता आली नाही. जनरल स्टोअर्स, स्टेशनरीचे दुकान, कॅंटीन, स्नॅक्‍स सेंटर येथेही ग्राहकांची गर्दी नव्हती. काही दुकानांमध्ये क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड स्वॅप करून ग्राहकांनी वस्तूंची खरेदी केली; पण किरकोळ विक्रेते आणि दुकानदारांकडे सुटे पैसे नसल्यामुळे काही किरकोळ विक्रेत्यांनी माल उधारीवरही दिला, तर काही दुकानांमध्ये शंभर, पन्नास, वीस व दहा रुपयांचीच नोट स्वीकारली जात होती. 

मोबाइल रिचार्ज करण्यासाठी लोक पाचशे व एक हजार रुपयांची नोट घेऊन येत होते; पण प्रत्येकाला सुटे पैसे देणे शक्‍य नव्हते. त्यामुळे काहींना रिचार्जसाठी नकार द्यावा लागला. ग्राहकांसह आमचीही पंचायत झाली आहे. 

हुसैनी पिरजादे, दुकानदार 

आज लोकांची गर्दी नव्हती. जे लोक खरेदीसाठी येत होते, त्यांच्याकडे पाचशे व एक हजार रुपयांची नोट होती. त्यामुळे काहींना उधारीवर माल दिला. सरकारने लवकरात लवकर यावर तोडगा काढावा. 

- के. आर. धूत, किराणा माल विक्रेते 

पाचशे रुपयाची नोट घेऊन सकाळी दूध आणायला गेले; पण दुकानदाराने पैसे स्वीकारण्यास नकार दिला. त्याशिवाय किराणा माल घेतानाही त्रास सहन करावा लागला. 

- मनीषा लोहार, ग्राहक 

सरकारने घेतलेला निर्णय चांगला आहे; पण त्याचा परिणाम व्यवसायावर झाला. फक्त 10 टक्के साहित्याची विक्री झाली. लोक गरजेनुसार माल विकत घेत होते. 

- बाबूलाल कासट, किराणा माल विक्रेते 

मॉल आणि हॉटेलमध्येही शुकशुकाट 

मॉल आणि हॉटेल्समध्येही ग्राहकांची गर्दी सकाळपासूनच नव्हती. मॉलमध्ये खरेदीसाठी येणाऱ्या लोकांनी क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड स्वॅप करून साहित्याची खरेदी केली. असेच चित्र हॉटेल्समध्येही होते. मॉल खरेदीसाठी क्रेडिट कार्ड व डेबिट कार्डचा पर्याय असल्यामुळे ग्राहकांची तारांबळ उडाली नाही. 

Web Title: currency affected market