परिणामाचे गांभीर्य आहे का? - सुशीलकुमार शिंदे

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016

पुणे - 'केवळ चलनी नोटांच्या अभावामुळे पुण्यासारख्या ठिकाणी एखाद्या नवजात अर्भकाचा मृत्यू झाला. याची जबाबदारी कोण घेणार? नोटाबंदीच्या निर्णयानंतर देशभरात अनेकांना जीव गमवावा लागला, ते अत्यंत दुर्दैवी आहे. याचे गांभीर्य निर्णयकर्त्या सरकारला आहे की नाही,'' असा सवाल माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केला.

शिंदे म्हणाले, 'नोटाबंदीचा निर्णय प्रथमदर्शनी चांगला आहे. काळा पैसा बाहेर काढण्याच्या प्रयत्नांना त्यातून पाठबळ मिळेल, असे सांगितले जात आहे. मात्र, व्यवहारातील चलनी नोटा बंद करून नव्या नोटा बाजारात आणताना होणाऱ्या परिणामांचा विचार सरकारने नक्की केला आहे की नाही, हा प्रश्‍न आता पडत आहे. निर्णयाच्या अंमलबजावणीची पद्धत पाहता सर्वसामान्यांनी घर चालवायचे तरी कसे, हा गंभीर प्रश्‍न निर्माण झाला आहे.''

सरकारने या विषयावर संसदेत चर्चा करावी, अशी आमची अपेक्षा आहे. मात्र, 'सभागृहाचे नेते' पंतप्रधान हेच संसदेत दर्शन देत नाहीत, तिथे चर्चेची अपेक्षा काय करावी ! मोदी बाहेर बोलतात आणि सभागृहात मात्र बोलण्याचे टाळतात, अशी टिप्पणीही शिंदे यांनी केली.

त्यांनाही देशद्रोही ठरवाल का?
सुशीलकुमार शिंदे म्हणाले, 'तुम्ही कोणाकोणाला आणि कशाकशासाठी देशद्रोही ठरवणार आहात? उद्या एखाद्याने घरातील स्वच्छतागृह वेळेवर स्वच्छ केले नाही; तर त्यालाही तुम्ही देशद्रोही म्हणून शिक्का मारणार का? जो सरकारच्या निर्णयाविरुद्ध बोलेल, तो देशद्रोही, असे म्हणणे सरकारने, सरकारी पाठीराख्यांनी वेळीच आवरायला हवे! लोकांच्या सहनशीलतेचा अंत पाहणे योग्य नाही.''

Web Title: currency ban bad effect