नोटा संपल्या, थांबू नये...

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 13 नोव्हेंबर 2016

पुणे - पाचशे, हजार रुपयांच्या नोटा बदलून घेण्याकरिता शहर आणि उपनगरांतील सर्वच टपाल कार्यालयांत व्यवस्था केल्याचा दावा टपाल विभाग गेल्या तीन दिवसांपासून करीत आहे. मात्र, रिझर्व्ह बॅंकेकडे मागणी करूनही वेळेत अर्थपुरवठा होऊ शकला नाही. त्यामुळे शनिवारी बहुतांश कार्यालयांतील गंगाजळी दुपारनंतरच संपली. परिणामी नागरिकांना द्यायला पैसेच नसल्याने, "नोटा संपल्या आहेत, नागरिकांनी थांबू नये', असे फलक टपाल

कार्यालयांत लागल्यामुळे अनेकांना रिकाम्या हातानेच घरी परतावे लागले.
दरम्यान, दुपारनंतर नोटा उपलब्ध झाल्याने, अन्य कार्यालयांना वितरित करण्यात आल्याचा दावा अधिकाऱ्यांनी केला.

जीपीओ, सिटी पोस्ट येथे नागरिकांनी शनिवारीही सकाळपासूनच नोटा बदलून घेण्याकरिता रांगा लावल्या होत्या. येथेही दुपारपर्यंत बॅंकेकडून आर्थिकपुरवठा न झाल्याने उपलब्ध गंगाजळीवरच नागरिकांची सोय करावी लागत असल्याचे तेथील कर्मचारी सांगत होते. पोलिस आयुक्तालय, ग्रामीण पोलिस अधीक्षक कार्यालय, ससून रुग्णालय तसेच विश्रामबागवाडा, रेल्वे स्टेशन येथील कार्यालयांत सुरू करण्यात आलेल्या स्वतंत्र कक्षाचा लाभ नागरिकांनी घेतला. परंतु, आर्थिक तुटवड्याअभावी इच्छा असूनही टपाल खात्याला नागरिकांना नोटा बदलून देता येत नव्हत्या.

आधार कार्ड, वाहन परवाना, निवडणूक ओळखपत्र, पास पोर्ट, मनरेगा कार्ड, पॅन कार्ड यांपैकी कोणतेही एक ओळखपत्र दाखवून नोटा बदलून देण्याकरिता अर्ज भरून घेण्यात येत आहेत. अपुऱ्या गंगाजळीबाबत पोस्ट मास्तर जनरल गणेश सावळेश्‍वरकर म्हणाले, ""स्टेट बॅंकेकडे केलेल्या मागणीपैकी वीस टक्केच रक्कम गेल्या तीन दिवसांत टपाल विभागाला उपलब्ध होत आहे. उपलब्ध झालेली रक्कम वेगवेगळ्या कार्यालयांत वितरित करावी लागते. लहान-मोठ्या कार्यालयांना शुक्रवारी दुपारी वितरित केलेली रक्कम शनिवारी दुपारी बारापर्यंत संपली. सिटी पोस्टात शनिवारी दुपारी बारापर्यंत नऊशे नागरिकांना पस्तीस लाख रुपये वितरित करण्यात आले. त्यापेक्षा वीस टक्के अधिक रक्कम जीपीओतून वितरित झाली. मात्र, स्टेट बॅंकेकडून मागणीप्रमाणे पुरवठ्याचा मुख्य प्रश्‍न टपाल विभागाला भेडसावतोय. उपलब्ध रकमेतूनच नागरिकांना सेवा पुरवावी लागत आहे.''

कार्यालये रविवारी दिवसभर सुरू
पाचशे, हजार रुपयांच्या नोटा बदलून देण्यासाठी आणि बचत खात्यातील व्यवहार करण्यासाठी पुणे शहर तसेच जिल्हा, सातारा, सोलापूर, अहमदनगर जिल्ह्यातील सर्व टपाल कार्यालये रविवारी (ता. 13) दिवसभर सुरू राहतील. नागरिकांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन टपाल विभागातर्फे सहायक पोस्ट मास्तर जनरल एफ. बी. सैय्यद यांनी केले आहे.

Web Title: currency finish, dont stop