बाजारपेठांमध्ये दुसऱ्या दिवशीही शुकशुकाट 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 नोव्हेंबर 2016

पुणे - दिवाळीच्या सुट्यांचा हंगाम अन्‌ लग्नसराई तोंडावर आली असताना पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा रद्द करण्याचा निर्णय केंद्र सरकारने जाहीर केल्यानंतर सलग दुसऱ्या दिवशीही त्यांचे पडसाद बाजारपेठांमध्ये उमटल्याचे दिसून आले. एरवी या हंगामात मोठ्या प्रमाणात होणारी खरेदी गुरुवारीही बऱ्यापैकी थंडावली होती. नागरिक जवळ असणारी रोख रक्कम आवश्‍यक खर्चासाठी बाजूला ठेवत आहेत. त्यामुळे रोख रकमेने होणाऱ्या व्यवहारांची गती तात्पुरती मंदावली असून, एकंदर बाजारपेठेतील उलाढाल 60 टक्‍क्‍यांनी घटल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. 

नोटा रद्द करण्याचा निर्णयानंतर बुधवारी बाजारपेठेतील काही व्यापारी गरजू ग्राहकांना सहकार्य करत होते. मात्र, गुरुवारी हे व्यापारी "कृपया 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा देऊ नका, त्या स्वीकारल्या जाणार नाहीत' अशी विनंती करत होते. शहरात प्रामुख्याने तुळशीबाग, लक्ष्मी रस्ता, कुमठेकर रस्ता, डेक्कन, रविवार पेठ परिसरातील व्यापाऱ्यांच्या व्यवहार थंडावल्याचे चित्र होते. मोठ-मोठ्या दुकानांमध्ये डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड "स्वॉइप' होत होते. दरम्यान रोख रकमेवर व्यवहार असणाऱ्या किरकोळ आणि पथारी व्यावसायिकांकडे मात्र अनेकांनी पाठ फिरवली. ""खरंतर सुट्या पैशांची ही टंचाई तात्पुरती असली तरी, वस्तू खरेदी करताना दहा वेळा विचार करावा लागतो,'' असे ग्राहकांचे म्हणणे होते. 

एरवी नागरिकांच्या गर्दीने चालायला जागा नसणाऱ्या आणि सदैव वाहतूक कोंडीने "फुल्ल' असणाऱ्या बाजारपेठांमध्ये या दिवसांत शुकशुकाट होता. तरी बुधवारच्या तुलनेत गुरुवारची स्थिती "बरी' आहे, असे व्यापाऱ्यांनी सांगितले. नागरिक आवश्‍यक वस्तूंच्याच खरेदीसाठी घराबाहेर पडत असल्यामुळे बाजारपेठेत शांतता पसरली होती. दिवाळीच्या सुटीत आणि हा सुटीचा हंगाम संपत आला की, अनेक जण खरेदीसाठी तुळशीबाग, लक्ष्मी रस्ता, डेक्कन परिसरात गर्दी करतात. मात्र, या वेळी ""खिशात 500 आणि 1000 च्या नोटा आहेत; परंतु त्याने वस्तू खरेदी करता येत नाही आणि सुट्टे पैसे आहेत, परंतु ते आवश्‍यक खर्चासाठी राखून ठेवणे गरजेचे आहे', अशा स्थितीत नागरिक असल्याचे पाहायला मिळाले. 

""तुळशीबागेत दररोज साधारणत: 20 ते 25 हजार नागरिक येतात. या परिसरातील प्रत्येक दुकानात दिवसभरात किमान 100 ते 150 ग्राहक खरेदीसाठी येत असतात. परंतु, गेल्या दोन दिवसांत हातावर मोजण्या इतकेच ग्राहक दुकानांमध्ये येत होते. डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड "स्वॉइप' करण्याची सोय असणाऱ्या दुकानांमध्ये मात्र खरेदी होत होती. काही ठिकाणी किरकोळ खरेदी सुरू होती. मात्र, तेथेही सुट्या पैशांचा प्रश्‍न उद्‌भवत होता. मात्र, दर दिवशीच्या तुलनेत या दिवसांत एकूण उलाढालीत तब्बल 60 टक्‍क्‍यांहून अधिक घट झाल्याचे पाहायला मिळाले.'' 
- नितीन पंडित, सचिव, तुळशीबाग परिसर व्यापारी संघटना 

""बुधवारी बाजारपेठेत शुकशुकाट होता. मात्र, त्या तुलनेत गुरुवारी स्थिती काही प्रमाणात सुधारल्याचे दिसून आले. अर्थात, गुरुवारीही दिवसभरात जवळपास 10 ते 12 ग्राहक खरेदी करण्यासाठी येत होते. त्यातील बहुतेक जण कार्ड "स्वॉइप' करत होते. रोख रक्कम देणाऱ्यांची संख्या तुलनेने कमी होती. या दिवसांत बाजारपेठेत नेहमीची गर्दी अनुभवायला मात्र मिळाली नाही.'' 
- मोहन साखरिया, व्यापारी

Web Title: currency impact on market