पैसा झाला खोटा, सोशल मीडियावर नोटा 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 10 नोव्हेंबर 2016

पुणे - चलनातून पाचशे व हजारच्या नोटा हद्दपार करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाचे जोरदार स्वागत व्हॉट्‌सऍपसह फेसबुक, ट्विटर या सोशल मीडियावर नागरिकांनी केले. आश्‍चर्य व्यक्त करणारे आणि विनोदी संदेशांनी मंगळवारची रात्र गेल्यानंतर बुधवारी दिवसभर मात्र आरबीआयच्या उपायांविषयी माहितीपूर्ण आणि लाखोंची "कॅश' जमा करण्यासाठी बॅंकेत धावू नका, असे सावध करणारे संदेश फिरत होते. 

पुणे - चलनातून पाचशे व हजारच्या नोटा हद्दपार करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाचे जोरदार स्वागत व्हॉट्‌सऍपसह फेसबुक, ट्विटर या सोशल मीडियावर नागरिकांनी केले. आश्‍चर्य व्यक्त करणारे आणि विनोदी संदेशांनी मंगळवारची रात्र गेल्यानंतर बुधवारी दिवसभर मात्र आरबीआयच्या उपायांविषयी माहितीपूर्ण आणि लाखोंची "कॅश' जमा करण्यासाठी बॅंकेत धावू नका, असे सावध करणारे संदेश फिरत होते. 

काळ्या पैशाविरोधात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या निर्णयाने अनेकांची झोप उडवली असल्याच्या प्रतिक्रियेने सोशल मीडियावरील चर्चेला मंगळवारी रात्री सुरवात झाली. बुधवारी दिवसभर यासंबंधीच्या पोस्ट व संदेशांनी मोबाईल "जॅम' झाला. भ्रष्टाचार करणाऱ्यांना मोदी यांनी सर्वांत मोठा धक्का दिला आहे. हा धाडसी निर्णय घेतल्याबद्दल अनेकांनी मोदींना "हॅट्‌स ऑफ' केले तर, काहींनी आगामी निवडणुकांवर या निर्णयाचा निश्‍चित परिणाम होईल, असा विश्‍वास व्यक्त केला आहे. नजीकच्या काळात काही राज्यांच्या विधानसभा निवडणुका आहेत, तर महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आल्या आहेत. त्यात मोठ्या प्रमाणात 500 आणि 1000 रुपयांच्या नोटांचा वापर केला जातो. या नोटाच आता चलनातून बाजूला केल्याने राजकीय नेत्यांना हा मोठा फटका असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. 

काही तरुणांनी या निर्णयाचे वर्णन "इकॉनॉमिक सर्जिकल स्ट्राइक' असे केले. त्याला शेकड्याने "लाइक्‍स' मिळाले आहेत. आता काळ्या पैशाविरुद्ध युद्ध सुरू झाले, अशा आशयाच्या "कॉमेंट्‌स' झळकल्याचे दिसत होते. 

हा एक ऐतिहासिक निर्णय असून, निर्णय जाहीर करण्यासाठी मोदी यांनी मोठे धाडस केले आहे. काळ्या पैशाच्या लढाईविरोधात प्रत्येक प्रामाणिक नागरिक सहभागी होणार असल्याचा विश्‍वास व्यक्त करण्यात आला आहे. 

अमेरिकेत होत असलेल्या मतमोजणीचा संदर्भ देत काहींनी "अमेरिका काउंटिंग व्होट्‌स, इंडियन काउंटिंग नोट्‌स' अशी "पोस्ट'ही व्हॉट्‌सऍपच्या "ग्रुप'वरून फिरत होती. 

"अशी ही बनवाबनवी' या मराठी चित्रपटातील अभिनेते अशोक सराफ आणि सुधीर जोशी यांच्यातील संवाद "तुम्ही दिलेले 500 रुपये वारले' हा सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. 

भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून सध्या कोठडीत असलेल्या राजकीय नेत्यांवरील विनोद, एटीएम केंद्रांच्या बाहेर लागलेल्या रांगा, टोलनाक्‍यांवर झालेली कोंडी असे अनेक मेसेज सोशल मीडियावर दिवसभर फिरत होते. 

Web Title: currency joke on social media