नोटाजप्ती प्रकरणात पोलिसांचेही हात ओले?

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 4 मार्च 2017

संशयितांचे जबाब आणि कॉल डिटेल्स काढण्याचे काम सुरू

संशयितांचे जबाब आणि कॉल डिटेल्स काढण्याचे काम सुरू
पुणे - कोथरूड पोलिसांनी पाचशे आणि हजार रुपयांच्या जुन्या नोटा जप्त केल्याच्या प्रकरणात काही पोलिस अधिकाऱ्यांनीही हात ओले करून घेतल्याची चर्चा सुरू आहे. दरम्यान, या प्रकरणात कोथरूड पोलिस ठाण्यातील उपनिरीक्षक, सहा कर्मचारी आणि व्यापाऱ्यांचे जबाब घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. संशयितांचे कॉल डिटेल्स रेकॉर्ड (सीडीआर) काढण्यात येत आहेत. त्यामुळे चौकशी अहवालानंतर नेमके कोण दोषी आहेत, हे स्पष्ट होणार आहे.

कोथरूड पोलिसांनी दोन फेब्रुवारी रोजी रात्री चलनातून बाद झालेल्या पाचशे आणि एक हजार रुपयांच्या 20 लाख रुपये किमतीच्या नोटा जप्त केल्या. त्याची पोलिस स्टेशन डायरीत नोंद करण्यात आली; मात्र मोठी कारवाई करूनही त्यांनी ही बाब प्रसारमाध्यमांसमोर येऊ दिली नाही. तसेच एका व्यापाऱ्याने वृत्तवाहिनीला मुलाखत देऊन मोटारीत मोठी रक्‍कम होती; परंतु पोलिसांनी 20 लाख रुपयेच दाखविल्याचा आरोप केला. त्यामुळे नेमकी किती रक्‍कम जप्त केली, यावरून संभ्रमाची स्थिती आहे. याबाबत उलटसुलट चर्चा सुरू झाल्यानंतर पोलिस उपायुक्‍त हिरेमठ यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. या प्रकरणाची सहायक आयुक्‍तांमार्फत चौकशी सुरू करण्यात येत आहे. त्यानुसार संबंधित पोलिस अधिकारी, कर्मचारी आणि व्यापाऱ्यांचे जबाब घेण्यात येत आहेत.

दरम्यान, दिघी पोलिसांनी 24 फेब्रुवारी रोजी एक कोटी 36 लाख रुपयांच्या पाचशे आणि हजार रुपयांच्या जुन्या नोटा जप्त केल्या आहेत. कोथरूडच्या घटनेनंतर दिघी पोलिसांचीही कारवाई संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. कोथरूड आणि दिघी पोलिसांनी केलेल्या कारवाईचे गौडबंगाल काय आहे, या दोन्ही घटनांचा काही संबंध आहे का, याचाही तपास पोलिस करत आहेत.

नोटाजप्तीप्रकरणी पोलिस उपनिरीक्षकासह सहा कर्मचाऱ्यांची चौकशी करण्यात येत आहे. संबंधित व्यापाऱ्यांचीही चौकशी करण्यात येईल. त्यांचे जबाब घेण्याचे काम सुरू आहे. त्यांचे कॉल डिटेल्स रेकॉर्ड काढण्यात येत आहेत. कोथरूड आणि दिघी पोलिसांच्या कारवाईचा आपापसांत काही संबंध आहे का, हेही तपासण्यात येत आहे. याबाबतचा चौकशी अहवाल लवकरच प्राप्त होईल. त्यात दोषी आढळणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात येईल.
- सुधीर हिरेमठ, पोलिस उपायुक्‍त, परिमंडल एक

Web Title: currency seized case involve in police

टॅग्स