नोटांचा पुरवठा तोकडाच; नागरिकांच्या रांगा संपेनात

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 8 डिसेंबर 2016

पुणे - बॅंकांनी केलेली मागणी आणि रिझर्व्ह बॅंकेकडून होणाऱ्या नव्या नोटांचा पुरवठा यामध्ये साधारणतः ५० टक्के तफावत असल्यामुळे मंगळवारीसुद्धा बॅंकांमध्ये आणि एटीएमबाहेर पैसे काढण्यासाठी नागरिकांची गर्दी दिसून आली. कामगारांच्या पगारासाठी पैसे काढण्याच्या व्यापारी, व्यावसायिकांकडून वाढलेल्या मागणीला तोंड देता देता बॅंक अधिकाऱ्यांची दमछाक होत आहे. 

चलनातून पाचशे व हजार रुपये मूल्याच्या नोटा बंद करण्याच्या निर्णयाला आता एक महिना पूर्ण होत आला आहे. पन्नास दिवसांमध्ये परिस्थिती पूर्ववत होण्याचे आश्‍वासन केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बॅंकेकडून देण्यात आले होते. मात्र यासाठी सुमारे वीस दिवसांचाच कालावधी शिल्लक राहिला आहे. या दिवसांमध्ये पाचशे रुपयांच्या नव्या नोटांचा पुरवठा मोठ्या प्रमाणात करण्याचे आव्हान रिझर्व्ह बॅंकेपुढे आहे. त्यामुळे बॅंकांमध्येही गर्दी आणि एटीएमबाहेरही रांगा असे चित्र विनाकारण निर्माण होत आहे. 

आयडीबीआय बॅंकेचे सर्व्हिस ऑपरेशन मॅनेजर संजय वनारसे म्हणाले, ‘‘खासगी बॅंकांच्या शाखा मर्यादित असल्यामुळे त्यांना प्रत्येक ग्राहकाला जादा रक्कम देणे शक्‍य होत आहे. मात्र आमच्यासारख्या बॅंकांचे नेटवर्क मोठे असल्यामुळे साहजिकच प्रत्येक ग्राहकाला पुरेशा प्रमाणात रक्कम देण्यासाठी आम्हाला नियोजन करावे लागत आहे. पाचशे रुपयांच्या नव्या नोटांचा पुरवठाही मागणीपेक्षा कमी होत आहे.’’ महाराष्ट्र बॅंकेचे पुणे शहर विभागाचे मुख्य व्यवस्थापक (प्रशासन) शुभांशू सक्‍सेना म्हणाले, ‘‘चलनपुरवठा कमी प्रमाणात होत आहे. असे असले तरी पुढील दहा दिवस ग्राहकांना रक्कम देण्यासाठीचे नियोजन आम्ही केलेले असते. पुरेशा प्रमाणात नोटा मिळाल्यानंतर परिस्थिती काही दिवसात सुधारेल.’’

Web Title: currency supply short