सध्याचा कारभार चालवला जातोय हिटलरप्रमाणे : अॅड. आंबेडकर

सकाळ वृत्तसेवा 
रविवार, 4 ऑगस्ट 2019

- अनेक प्रकरणात चौकशी सुरू असल्याने काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीतील नेते भाजपमध्ये प्रवेश करत आहेत.

पुणे : अनेक प्रकरणात चौकशी सुरू असल्याने काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडीतील नेते भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. 'ईडी'च्या दबावाखाली ते भाजपमध्ये जात नसून, 'ब्लॅकमेलिंग' होत असल्याने ते पक्षांतर करत आहेत. तिहार किंवा आर्थर रोड तुरुंगात जाण्यापेक्षा भाजपचे तुरुंग ते स्वीकारत आहे,' अशा शब्दात वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी पक्षांतर करणाऱ्या नेत्यांवर रविवारी टीका केली. तसेच सध्याचा कारभार हिटलरप्रमाणे चालवला जात आहे, असेही ते म्हणाले.

आमच्या पक्षातही आघाडीतील अनेक नेते संपर्कात होते. मात्र, त्यांना आम्ही पक्षात घेतले नाही आणि माझ्याकडून अशा स्वरुपाचे फोडाफोडीचे राजकारण केव्हाच होणार नाही. सध्याचा कारभार हिटलरप्रमाणे चालवला जात आहे,' अशी टीका भाजपच्या कारभारावर त्यांनी यावेळी केली.

विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत जाणार का, या प्रश्‍नाला उत्तर देताना डॉ आंबेडकर म्हणाले, "लोकसभा निवडणुकीदरम्यान आघाडीतील अनेक नेत्यांकडून वंचित आघाडीला भाजपाची 'बी टीम' म्हणून सतत टीका केली. यावर आघाडीतील नेत्यांनी अगोदर स्पष्टीकरण द्यावे आणि त्यानंतर ठरविले जाणार आहे. आता आम्ही विधानसभा निवडणुकीत 288 जागांवर उमेदवार देणार आहोत.' 

विरोधकांनी सुरू केलेल्या इव्हीएम विरोधातील आंदोलनावर बोलताना डॉ. आंबेडकर म्हणाले, 'इव्हीएमच्या विरोधात आंदोलन म्हणजे पळपुटेपणा व फसवेपणा आहे. परंतु आमचा आंदोलनास पाठिंबा आहे. 

तसेच आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री करण्याबाबतच्या शिवसेनेच्या भूमिकेबद्दल ते म्हणाले , "शिवसेनेकडून आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री करण्याची मागणी होत आहे. त्यांच्या भात्यातून आता बाण निघाला आहे. यावर दोन्ही पक्षांमध्ये कोण नमते घेते आहे, हे पाहणे गरजेचे ठरणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The current Government Working Like Hitlers Autocratic says Prakash Ambedkar