मेट्रो तुपाशी, बीआरटी उपाशी!

मेट्रो तुपाशी, बीआरटी उपाशी!

पुणे : मेट्रो प्रकल्पासाठी पायघड्या घालणाऱ्या महापालिकेने सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या बस रॅपिड ट्रान्झिटकडे (बीआरटी) दुर्लक्ष केल्यामुळे गेल्या तीन वर्षांत एकही नवा बीआरटी मार्ग साकारलेला नाही. उलट असलेले मार्ग आता बंद होऊ लागले आहेत. त्यामुळे बीआरटीला घरघर लागली आहे. बीआरटीसाठी अर्थसंकल्पात दरवर्षी कोट्यवधी रुपयांची तरतूद होत असताना महापालिकेतील सत्ताधारी प्रत्यक्षात भलतीकडेच पैशाची उधळपट्टी करीत आहेत. 

बीआरटीमुळे प्रवासी वाहतूक सुलभ, वेगाने होते, हे सातारा रस्ता, सोलापूर रस्ता, नगर रस्ता आणि विश्रांतवाडी मार्गांतून दिसून आले. तरीही, महापालिकेतील सत्ताधारी बीआरटीच्या नियोजित मार्गांकडे दुर्लक्ष करीत आहेत. तत्कालीन आयुक्त कुणाल कुमार यांनी 2017-18 मध्ये बीआरटीचे 45 किलोमीटरचे मार्ग सुरू करण्याची घोषणा करून निधीही उपलब्ध करून दिला होती. परंतु, सध्या बीआरटीचे मार्ग एकामागे एक बंद पडू लागले आहेत. 11 हजार कोटी रुपयांच्या मेट्रो प्रकल्पाला सध्या प्राधान्य दिले जात असल्यामुळे बीआरटीकडे दुर्लक्ष होत असल्याचे प्रशासकीय वर्तुळातून सांगण्यात येत आहे. तर, प्रवाशांची संख्या वाढविण्यासाठी पीएमपीलाही बीआरटीची आवश्‍यकता आहे. 

आता रस्त्याची रुंदी हवी 45 मीटर 

36 मीटर रुंदीच्या रस्त्यावर बीआरटीसाठी फक्त 3.5 मीटर रस्ता लागणार, असे गृहीत धरून महापालिकेने बीआरटी मार्गांची आखणी केली होती. केंद्र, राज्य सरकारनेही ते मंजूर केले. परंतु, प्रशासन आता 45 मीटरपेक्षा रुंद रस्त्यांवरच बीआरटी करण्याच्या प्रस्तावावर विचार करीत आहे. त्यामुळे सहा-सात रस्त्यांवरच बीआरटी होऊ शकते. 

"जनमार्ग'ची पाहणी ठरली ट्रिप! 

अहमदाबादची "जनमार्ग' बीआरटी देशात सर्वाधिक यशस्वी झाली. महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी दोन वेळा तिची पाहणी केली. कोट्यवधी रुपयांचा खर्चही झाला. परंतु, अहमदाबादसारखी बीआरटी करणे पुणे महापालिकेतील सत्ताधाऱ्यांना शक्‍य झाले नाही. तत्कालीन पालकमंत्री अजित पवार यांनी पुढाकार घेतल्यामुळे नगर रोड, विश्रांतवाडी, सातारा रस्ता, सोलापूर रस्त्यावर आदर्शवत बीआरटी सुरू झाली. परंतु, आता पुन्हा तिला घरघर लागली आहे. 

देशात 423 किलोमीटरचे उद्दिष्ट 

सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी केंद्र सरकारने 2010 मध्ये देशात 423 किलोमीटर बीआरटीचे उद्दिष्ट ठेवले. त्यात पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये सुमारे 150 किलोमीटर बीआरटी करण्याचे ठरले. त्यासाठी दोन्ही शहरांना जवाहरलाल नेहरू नागरी पुनरुत्थान योजनेंतर्गत (जेएनएनयूआरएम) सुमारे 1100 कोटी रुपयांचा निधी मिळाला होता. हा निधी प्रामुख्याने रस्त्यावर खर्च झाला. बीआरटीच्या पथदर्शी प्रकल्पांबाबत महापालिकेचा धरसोडपणा कायम राहिला. त्यामुळे सध्या फक्त 10-11 किलोमीटरचा बीआरटी मार्ग कार्यान्वित आहे. 

बीआरटी मार्गांची सद्यःस्थिती

सुरू असलेला बीआरटी मार्ग ः संगमवाडी-विश्रांतवाडी 
नगर रस्ता ः मेट्रोच्या कामामुळे बहुतांश बीआरटी मार्ग बंद 
सातारा रस्ता ः काम पूर्ण होण्यासाठी जून 2020 उजाडणार 
सोलापूर रस्ता ः बीआरटी सुरू करण्यासाठी प्रशासनाला 40 कोटी हवेत. पण, 10 कोटीच उपलब्ध 

बोपोडी-संचेती रुग्णालय ः खडकी कॅंटोन्मेंट बोर्डाच्या अखत्यारीतील 2.25 किलोमीटरचा प्रश्‍न अनिर्णीत 
औंध-सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ ः वाहतूक पोलिसांच्या आक्षेपामुळे काम रखडले 
संचेती रुग्णालय-विद्यापीठ रस्ता ः मेट्रोच्या नियोजित कामामुळे बीआरटीचा प्रस्ताव रद्द 
बाणेर रस्ता ः मेट्रोच्या नियोजित कामामुळे बीआरटीचा प्रस्ताव रद्द 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com