सध्या एकत्रित प्रचार करा

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 जानेवारी 2017

भाजपचा इच्छुकांना आदेश; कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांसमोर पेच

पुणे - ‘‘पक्ष ज्याला उमेदवारी द्यायची ते देईल...तूर्तास वेगवेगळा प्रचार करू नका...सगळ्यांनी एकत्र प्रचार करा,’’ असा आदेशच शहर भाजपने आपल्या सर्व इच्छुक उमेदवारांना दिला आहे. त्यानुसार काही प्रभागांत एकत्रित, तर काही ठिकाणी स्वतंत्रपणे प्रचार सुरू आहे. 

भाजपचा इच्छुकांना आदेश; कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांसमोर पेच

पुणे - ‘‘पक्ष ज्याला उमेदवारी द्यायची ते देईल...तूर्तास वेगवेगळा प्रचार करू नका...सगळ्यांनी एकत्र प्रचार करा,’’ असा आदेशच शहर भाजपने आपल्या सर्व इच्छुक उमेदवारांना दिला आहे. त्यानुसार काही प्रभागांत एकत्रित, तर काही ठिकाणी स्वतंत्रपणे प्रचार सुरू आहे. 

महापालिका निवडणुकीकरिता शिवसेनेबरोबर भाजपची युती, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी होणार की नाही, हे येत्या तीन-चार दिवसांत स्पष्ट होण्याची शक्‍यता आहे. त्या पार्श्‍वभूमीवर ज्यांची उमेदवारी निश्‍चित मानली जात आहे, अशा विद्यमान नगरसेवकांनी यापूर्वीच प्रचाराला सुरवात केली आहे.

काही जण नुकतेच प्रचारात उतरले आहेत. ही स्थिती सर्व पक्षांत असली तरी ‘अच्छे दिन’ आलेल्या भाजपकडे इच्छुकांची संख्या जास्त आहे. अनेक जण उमेदवारीसाठी भाजपच्या दारात उभे आहेत. उमेदवारी मिळविण्यासाठी इच्छुकांकडून पक्षाचे पदाधिकारी, आमदार, पालकमंत्री, राज्यमंत्री यांच्याकडे जोरदार पाठपुरावा सुरू आहे. कोणाला उमेदवारी द्यावी, कोण सक्षम आहे, आपल्या समर्थकांची वर्णी कशी लावावी, मागील निवडणुकीत मदत केलेल्यांना दिलेला शब्द कसा पाळता येईल, अशा गोष्टींचा विचार पदाधिकारी, लोकप्रतिनिधी करत आहेत. दुसरीकडे मोठ्या प्रभागांमुळे प्रत्येक मतदारापर्यंत पोचण्याचे आव्हान उमेदवारांसमोर आहे.

उमेदवारी निश्‍चित झाल्याचे मानून प्रचाराला सुरवात करण्याच्या निरोपाची वाट न पाहता काही इच्छुकांनी आपली प्रचारपत्रके मतदारांपर्यंत पोचविण्यास सुरवात केली आहे. प्रत्येक जण स्वतंत्रपणे प्रचार करत असल्याचे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या लक्षात आले. त्यांनी सर्वांनाच एकत्रित प्रचार करण्याचे आदेश दिले आहेत. कोणालाही पक्ष उमेदवारी देईल; पण तुम्ही तूर्तास एकत्रित प्रचार करा, असा आदेश मान्य करत काही जणांनी तशा प्रचाराला सुरवातही केली. या एकत्रित प्रचारामुळे बंडखोरी होण्याचा धोका टाळता येऊ शकतो, असे पक्षातील काहींना वाटते. 

कोणाचे नाव लक्षात ठेवायचे?
स्थानिक पातळीवरील राजकीय घडामोडी अडचणीच्या ठरू नयेत, राजकीय वाटचालीत अडथळा येऊ नये, यासाठी तसेच आपापसांत मतभेद असलेले काही जण स्वतंत्रपणेच प्रचार करण्यावर भर देत आहेत. त्यामुळे इच्छुकांची संख्या जास्त असलेल्या प्रभागात कोणाचा चेहरा, नाव लक्षात ठेवायचे, असा प्रश्‍न मतदारांच्या मनात निर्माण झाला आहे.

Web Title: Currently joint promotion by bjp