बेकरीचा नागरिकांच्या आरोग्याशी खेळ

कृष्णकांत कोबल
शुक्रवार, 13 जुलै 2018

एका नामवंत कंपनीसाठी केक बनविल्या जात असलेल्या हडपसर येथील बेकरीतील अस्वच्छतेबाबत एका नागरिकाने तक्रार केली आहे. मात्र, तीन दिवस होऊनही संबधित प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद मिळलेला नाही.

मांजरी - राज्यसरकारच्या अन्न व औषध प्रशासनासह पालिकेच्या आरोग्य विभागाच्या दुर्लक्षामुळे अनेक बेकरी उत्पादक पुन्हा एकदा नागरिकांच्या आरोग्याशी खेळू लागले आहेत. एका नामवंत कंपनीसाठी केक बनविल्या जात असलेल्या हडपसर येथील बेकरीतील अस्वच्छतेबाबत एका नागरिकाने तक्रार केली आहे. मात्र, तीन दिवस होऊनही संबधित प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद मिळलेला नाही. त्यामुळे नागरिकांकडून प्रशासनाच्या अकार्यक्षमतेबाबत संताप व्यक्त केला आहे. 

सचिन वनिकर हे नागरिक गुरूवारी (ता. 12) हडपसर येथील कन्यादान मंगल कार्यालयाजवळील ईसेवा केंद्रामध्ये जात होते. त्यावेळी त्यांना तेथे अस्वच्छ वातावरणात केक बनविले जात असल्याचे दिसले. त्यावेळी त्यांनी आतमध्ये डोकाऊन पाहिले असता गंभीर परिस्थिती पाहवयास मिळाली. या बेकरी उत्पादक दुकानात दीड वर्षापूर्वीच मुदत संपलेल्या केक बनविण्याची पावडरच्या पिशव्या, तयार केक ठेवण्यासाठी वापरले जाणारे मळकट व पायदळीचे कागदी पुठ्ठे, केकला चिकटलेले वर्तमान पत्राचे मळकट पेपर, अस्वच्छ टाॅयलेट, त्यात आत बाहेर कर्मचाऱ्यांकडून वापरली जाणारी स्लीपर, अस्ताव्यस्त पडलेले टायर, गोणी, फिरणारी झुरळे, डोक्यावर टोपी व हातमोजे न वापरता केक बनविणारे मळकट कपड्यातील कर्मचारी अशी परिस्थिती त्यांनी समोर आणली. 

वनिकर यांना रात्री विमानाने लखनऊ येथे जायचे होते. मात्र, नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या या दुकानावर कारवाई होणे गरजेचे असल्याने त्यांनी तिकीट रद्द करून पाठपुरावा करण्याचे ठरविले. अन्न व औषध निरीक्षक अनील गवते व पालिका आरोग्य विभागाशी त्यांनी संपर्क साधन्याचा प्रयत्न केला मात्र, त्यांना काल दिवसभर प्रतिसाद मिळाला नाही. मोबाईलवरून मेसेज व फोटो पाठवूनही त्यांनी कारवाईची विनंती केली तरीही दाद घेतली गेली नाही. आजही त्यांनी तसा प्रयत्न केला मात्र, केवळ पालिका आरोग्य अधिकारी येऊन माहिती घेऊन गेले. अन्न निरीक्षकांनी मात्र, त्याकडे पूर्ण दुर्लक्ष केले आहे. अखेर त्यांनी मुख्यमंत्र्यांसह विविध ठिकाणी ही माहिती पाठविली आहे. आजही ते याबाबतचा पाठपुरावा करीत आहेत.

एका नामवंत केक कॅफेसाठी येथून केक पुरविले जात आहेत. या दुकानाला कोणतेही नाव नाही. नोंदणी बाबत कोणतेही प्रमाणपत्र येथे लावले नाही. गेली तीन वर्षापासून येथे अशा घाणेरड्या वातावरणात केक बनविले जात आहेत. दररोज येथे सुमारे दीडशे केक बनविले जातात, अशी माहिती येथील कर्मचाऱ्यांनी दिली. याबाबत अन्न निरिक्षक गवते यांना संपर्क साधन्याचा प्रयत्न केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

"येथील केक उत्पादन पाहण्याच्या कुतुहलापोटी मी आतमध्ये डोकावल्यावर तेथील परिस्थिती पाहून धक्का बसला. इतक्या घाणेरड्या पध्दतीत व वातावरणात केक बनविताना पाहिल्यावर किळस आली. अक्षरशः नागरिकांच्या आरोग्याशी खेळले जात असल्याचे चित्र दिसले. त्याचे गांभिर्य लक्षात घेऊन संबंधीत विभागाला दुकानावरील कारवाईसाठी मी कालपासून पाठपुरावा करीत आहे. मात्र, त्यांनाही नागरिकांच्या आरोग्याचे काही देणे-घेणे नसल्याचा अनुभव मला येत आहे.'' - सचिन वनिकर

 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

 

Web Title: The customer complained against a reputable bakery for uncleanness at manjari