गहू खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 19 एप्रिल 2017

वर्षभरासाठी खरेदी करणाऱ्यांचा महोत्सवांना प्रतिसाद

पुणे - गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी असलेले भाव आणि चांगली प्रत असल्याने मार्केट यार्ड आणि शहराच्या इतर भागात आयोजित केल्या जाणाऱ्या गहू महोत्सवाला प्रतिसाद वाढला आहे. विशेषतः वर्षभरासाठी खरेदी करणाऱ्या ग्राहकांची संख्या त्यामध्ये जास्त आहे.

वर्षभरासाठी खरेदी करणाऱ्यांचा महोत्सवांना प्रतिसाद

पुणे - गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी असलेले भाव आणि चांगली प्रत असल्याने मार्केट यार्ड आणि शहराच्या इतर भागात आयोजित केल्या जाणाऱ्या गहू महोत्सवाला प्रतिसाद वाढला आहे. विशेषतः वर्षभरासाठी खरेदी करणाऱ्या ग्राहकांची संख्या त्यामध्ये जास्त आहे.

गेली दोन वर्षे हवामानाने साथ न दिल्याने गव्हाचे भाव जास्त होते. या वर्षी पावसाने दिलेली साथ आणि अनुकूल हवामान यामुळे गव्हाचे उत्पादन चांगले झाले आहे. पुण्यातील बाजारपेठेत मध्य प्रदेश आणि गुजरात या दोन राज्यांतून गव्हाची आवक होत असते. साधारणपणे सध्या ३० ते ३५ ट्रक इतकी आवक होत आहे. यामध्ये मध्य प्रदेशातील गव्हाचे प्रमाण अधिक आहे. 

गव्हाचे लोकवन, सिहोर आणि सिहोरी असे तीन प्रकार असून, त्यांच्या प्रतिनुसार उपप्रकारातील गहू बाजारात उपलब्ध झाले आहेत. तांदळाचा हंगाम सुरू झाल्यानंतर व्यापारी तांदूळ महोत्सवाचे आयोजन करीत असतात, त्याचप्रमाणे नवीन गहू बाजारात येऊ लागल्यानंतर गहू महोत्सवाचे आयोजन केले जाते. या वर्षी मार्केट यार्ड येथील किराणा भुसार मालाच्या घाऊक बाजारात गहू महोत्सवाचे आयोजन काही व्यापाऱ्यांनी केले आहे. लोकवन आणि सिहोर या दोन प्रकारच्या गव्हाला चांगली मागणी असल्याचे व्यापारी राजेंद्र चांडक यांनी नमूद केले. 
 

रास्त भावामुळे प्रतिसाद
या वर्षी मालाची प्रत चांगली आहे, गहू भरदार असल्याने ग्राहकांकडून खरेदीला प्रतिसाद मिळत आहे. भावही रास्त असल्याने खरेदीसाठी गर्दी वाढली आहे. पूर्वी तांदूळ आणि गहू वर्षभरासाठी खरेदी केले जात होते. तांदूळ हा आता एक किलोपासून ते २५ किलोच्या गोणीपर्यंत विविध वजनात उपलब्ध होत आहे. त्यामुळे ग्राहक तांदूळ त्याला पाहिजे तेवढ्या प्रमाणातच खरेदी करतो. गव्हाच्या बाबतीत ही परिस्थिती नाही. तीस किलोच्या गोणीतून त्याची विक्री होते, असे व्यापारी अभय संचेती यांनी सांगितले. 

गहू महोत्सवात ग्राहकांच्या प्रमाणात गेल्या वर्षीच्या तुलनेत दहा टक्के वाढ झाली असून, पुढील काळात प्रतिसाद आणखी वाढण्याची अपेक्षा आहे.
- सूर्यकांत पाठक, ग्राहक पेठ

Web Title: customer rush for wheat purchasing