
पुण्याचे पाणी कापणार, महापौरांनी दिला आंदोलनाचा इशारा
पुणे - पुणे महापालिकेला पाणी वापर कमी करण्यासाठी वारंवार सूचना देऊनही त्यावर नियंत्रण आणले नाही. त्यामुळे उद्यापासून (ता.३) खडकवासला धरणातील पाणी वाटपावर थेट पाटबंधारे विभाग नियंत्रण करणार असून, पोलिस बंदोबस्तात पुण्याचे पाणी कपात केले जाणार असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महापालिकेत ३४ गावे आल्यानंतर पाच लाख लोकसंख्येचा भार शहरावर आल्याने पाणी कोटा वाढविण्याऐवजी उलट थेट कारवाई केली जात असल्याने यावरून महापौर मुरलीधर मोहोळ यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
पाटबंधारे विभागाने महापालिकेसोबत ११.५ टीएमसी पाण्याचा करार केलेला आहे. भामा आसखेड धरणातून पुण्याला २.६७ टीएमसी पाणी मिळत आहे. पाटबंधारे विभागाने भामा आसखेडमधून मिळणारे पाणी हे ११.५ टीएमसी यातील आहे तो अतिरिक्त कोटा नाही. त्यामुळे खडकवासला धरणातून वापरले जाणाऱ्या पाण्याचे प्रमाण कमी करावे असे यापूर्वी सांगितले आहे. २२ जानेवारी रोजी झालेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत पालकमंत्री अजित पवार आणि राज्यमंत्री दत्ता भरणे यांनी महापालिकेला पाणी वापर कमी करण्याच्या सूचना दिल्या होत्या. तसेच २६ मार्च रोजीच्या कालवा समितीच्या बैठकीत देखील अजित पवार यांनी पुन्हा एकदा महापालिकेला सूचना केली होती.
हेही वाचा: आरोग्य विभाग पेपरफुटी प्रकरण : कसं आणि कुठं रचलं कारस्थान?
महापालिका सध्या खडकवासला धरणातून १४६० एमएलडी आणि भामा खासखेड धरणातून १८० एमएलडी पाणी रोज वापरत आहेत. याच पद्धतीने पाणी वापरल्यास जून जुलै महिन्यात पाणी टंचाई निर्माण होऊ शकते.
तसेच उन्हाळ्यात शेतीसाठी खडकवासल्यातून पाणी सोडावे लागणार असल्याने शेतीसाठीही टंचाई निर्माण होऊ शकते. हे निदर्शनास आणून देखील महापालिकेने पाणी वापरावर नियंत्रण आणले नसल्याचे पाटबंधारे विभागाच्या सहाय्यक अभियंता श्रेणी २च्या अधिकाऱ्याने पर्वती जलकेंद्राच्या कार्यकारी अभियंता पदावरील अधिकाऱ्यांना पाठविलेल्या पत्रात नमूद केले आहे. तसेच पाटबंधारे विभागाने यासंदर्भात उत्तम नगर पोलिसांनाही पत्र पाठवून कोपराकुटी वारजे फेज येथे पोलिस बंदोबस्त द्यावा अशी विनंतीही केली आहे.
पर्वती जलकेंद्रावर आज (गुरुवारी) दुपारी हे पत्र मिळताच. याबाबत पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांना यांची माहिती देण्यात आली. शुक्रवारपासूनच पाणी कपात केली जाणार असल्याने प्रशासनात एकच खळबळ उडाली. पाटबंधारेच्या या पत्रावर महापौर मुरलीधर मोहोळ यांनी तीव्र आक्षेप घेतला असून, उद्या पाणी कपात केले तर धरणावर जाऊन आंदोलन करेन असा इशारा दिला आहे. दरम्यान, यासंदर्भात महापालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
हेही वाचा: पुणे : मतदार नोंदणीसाठी पाच डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
‘पाटबंधारे विभागाचे पत्र आज मिळाले आहे. महापालिकेने पाणी वापर कमी न केल्याने खडकवासला धरणातील पाणी पोलिस बंदोबस्तात नियंत्रित केले जाईल असे नमूद केले आहे. पाणी वापर कमी करण्यासाठी महापालिकेचे प्रयत्न सुरू आहेत.’
- अनिरुद्ध पावसकर, प्रमुख, पाणी पुरवठा विभाग
‘शेतीसाठी पाणी देण्यासाठी आमचा विरोध नाही. पण पुण्यात नव्याने ३४ गावे समाविष्ट झाली आहेत, तेथील नागरिकांना पाणी द्यावे लागत आहे. महापालिकेची पाणी पुरवठा यंत्रणा सुधरविण्यासाठी समान पाणी पुरवठा योजनेचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. यातून पाण्याची बचतही होणार आहे. पण यासाठी काही अवधी लागणार आहे. ही वस्तुस्थिती लक्षात न घेता पाटबंधारे विभाग पोलिस बंदोबस्तात पुण्याचे पाणी कमी करण्याचा निर्णय घेत असल्याने त्याचा मी निषेध करतो. पाटबंधारे विभाग परिस्थितीचे भान न ठेवता सुलनाती कारभार करणार असेल तर तो आम्ही सहन करणार नाही. थेट धरणातून पाणी कपात केले जाणार असेल तर धरणावर जाऊन मी आंदोलन करणार आहे. माझ्यावर कारवाई करावी.’
- मुरलीधर मोहोळ, महापौर
Web Title: Cut Pune Water Mayor Warned Of Agitation
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..