हॉटेल दिसावे म्हणून फांद्यांवर कुऱ्हाड ; कर्वेनगर येथील प्रकार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 13 मे 2018

उद्यान विभागाचा हा कारभार महापालिकेसाठी लाजिरवाणा आहे. एखाद्या सामान्य नागरिकाने घरासमोरील झाडाची फांदी तोडली तरी त्याच्यावर लगेच कायद्याचा बडगा उगारला जातो. हॉटेल व्यावसायिकाच्या सांगण्यावरून फांद्या तोडल्या असल्यास अधिकाऱ्यांची चौकशी होणे गरजेचे आहे. 
- विजय साळुंके, नागरिक, कर्वेनगर 

वारजे : झाडांच्या फांद्यांमुळे हॉटेल दिसून येत नाही म्हणून महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी रस्त्यावरील फक्त एकाच झाडाच्या फांद्या छाटल्या. या फांद्यांची वाहतुकीला कोणतीही अडचण नसताना केवळ येणाऱ्या- जाणाऱ्यांना हॉटेल दिसावे म्हणून फांद्या तोडल्याने नागरिकांमध्ये हा चर्चेचा विषय झाला आहे. महापालिकेचा उद्यान विभाग नागरिकांसाठी आहे की हॉटेलसाठी, असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे. 

कर्वेनगर येथे उड्डाण पूल संपल्यानंतर डाव्या बाजूला मोठे हॉटेल आहे. या हॉटेलजवळील पदपथावर अनेक झाडे आहेत. त्यामधील एका झाडाच्या फांद्यांमुळे हॉटेल दिसत नव्हते. प्रत्यक्षात या फांद्यांची नागरिकांना कोणतीच अडचण नव्हती. तसेच, त्या रस्त्यावरही आल्या नव्हत्या.

तरीही उद्यान विभागाच्या कर्मचाऱ्यांनी फांद्या तोडल्या. हॉटेलमधील कर्मचारी सांगेल त्या पद्धतीने ही फांद्यातोड सुरू होती. काही नागरिकांनी याबाबत कर्मचाऱ्यांकडे विचारणा केली असता, आमच्या साहेबांनी सांगितले म्हणून आम्ही हे काम करीत असल्याचे त्यांनी सांगितले. 

झाडांच्या फांद्याच छाटायच्या होत्या, तर उद्यान विभागाने अन्य झाडांच्याही फांद्या छाटायला हव्या होत्या; परंतु तसे न करता संबंधित हॉटेल व्यावसायिकाच्या मर्जीखातर हे काम केल्याचे दिसून येते. एरवी सर्वसामान्य नागरिकांनी एखादी फांदी तोडली तर त्याच्यावर लगेच कायद्याचा बडगा उगारला जातो, अशा प्रतिक्रिया संतप्त नागरिकांनी व्यक्त केल्या. 

या संदर्भात वृक्ष निरीक्षक ज्ञानेश्‍वर बालवडकर यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले, ""विद्युत दिवा असल्याने फांद्या छाटल्या आहेत. सध्या एकाच झाडाच्या फांद्या छाटल्या आहेत. नंतर सर्वच झाडांच्या फांद्या छाटण्यात येणार आहेत.'' 
 

Web Title: Cut Trees because of Hotel show at Karvenagar