सध्याची मुलं सायबरची गुलाम - तावडे

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 जानेवारी 2019

पुणे - ‘सध्याची मुलं सायबरची गुलाम झाली आहेत. आता या गुलामीविरोधात आंदोलन करण्याची वेळ आली आहे. त्यामुळेच विद्यार्थ्यांना आठवड्यातील एक संध्याकाळ घरी कोणत्याही गॅझेटविना कुटुंबाबरोबर घालवण्यासाठी प्रवृत्त करा, अशा सूचना शाळांना दिल्या आहेत,’’ असे शिक्षण आणि सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी सांगितले.

पुणे - ‘सध्याची मुलं सायबरची गुलाम झाली आहेत. आता या गुलामीविरोधात आंदोलन करण्याची वेळ आली आहे. त्यामुळेच विद्यार्थ्यांना आठवड्यातील एक संध्याकाळ घरी कोणत्याही गॅझेटविना कुटुंबाबरोबर घालवण्यासाठी प्रवृत्त करा, अशा सूचना शाळांना दिल्या आहेत,’’ असे शिक्षण आणि सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी सांगितले.

राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य मंत्रालयाचा पं. भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ बासरीवादक पं. केशव गिंडे यांना देण्यात आला. ज्येष्ठ गायक नाथ नेरलकर यांच्या हस्ते तो प्रदान करण्यात आला. या वेळी तावडे बोलत होते. आमदार मेधा कुलकर्णी, पुरस्कार समितीच्या सदस्य शुभदा पराडकर, उस्ताद उस्मान खाँ, स्वाती काळे आदी उपस्थित होते. पाच लाख रुपये, शाल आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
तावडे म्हणाले, ‘‘पं. गिंडे यांनी शाळेच्या अभ्यासक्रमात संगीत विषय आणण्याची सूचना केली आहे, त्याचा निश्‍चितपणे सरकार विचार करेल.’’

पं. गिंडे म्हणाले, ‘‘माझा सन्मान झाला, तसा अनेक वाद्यवादकांचाही करावा. मला मिळालेल्या पुरस्काराची रक्कम मी स्वतःसाठी नव्हे; तर बासरीचा आणखी उत्कर्ष, त्याचे शिक्षण आणि संशोधनासाठी वापरणार आहे. मला आईने सहाव्या वर्षी बासरी हाती दिली. तिला आणि माझ्या गुरूंना हा पुरस्कार समर्पित करतो.’’ शाळांमध्ये संगीत विषयाला महत्त्व नाही. हा विषय मुलांच्या भल्यासाठी सक्तीचा करण्याची सूचनाही त्यांनी केली.

तावडेंनी पगार दिला
गिंडे यांनी पुरस्काराची रक्कम बासरी संशोधनासाठी वापरणार असल्याचे जाहीर केल्याचा धागा पकडत तावडे यांनी या कार्यात माझाही हातभार लावतो, असे म्हणत एक महिन्याचा दीड लाख रुपये पगार देत असल्याचे जाहीर केले.

मुलगा बासरी वाजवतो
पं. केशव गिंडे यांच्या पत्नी वीणा यांनी त्यांच्या लग्नाच्या वेळी घडलेला किस्सा सांगितला. ‘‘आमचं लग्न पन्नास वर्षांपूर्वी ठरलं. घरात चर्चेत मी म्हटलं, सगळं ठीक आहे; पण मुलगा बासरी वाजवतो. मग भावाने माझी समजूत काढली, की साखर कारखान्याच्या मशिनबरोबर असणारा माणूस कितीकाळ बासरी वाजवणार? तरुण वयात असतात मुलांना छंद, नंतर सुटेल. पण पुढे लग्न झाल्यावर समजलं की बासरी हा काही या माणसाचा नुसता छंद नाही, तर ध्यास आहे. त्या ध्यासाची प्यास मात्र अजूनही संपलेली नाही,’’

Web Title: Cyber Child Vinod Tawde